Maharashtra Cabinet Expansion | सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वाधिक ताकद ही शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधूनच मिळाली होती. औरंगाबादसह मराठवाड्यातील बहुतांश शिवसेना आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाला होता. एवढेच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व विधानसभा सदस्यांनी उद्धव ठाकरेंचे शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे गटाचा गंडा बांधला होता.

हायलाइट्स:
- औरंगाबादकडे नेहमीच महाराष्ट्रातील ‘हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा’ म्हणून पाहिले गेले आहे
- मंत्रिमंडळातील हा भौगोलिक असमतोल चांगलाच नजरेत भरणारा
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून औरंगाबादमधील आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली. तर भाजपकडूनही अतुल सावे यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये औरंगाबादला आत्ताच तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. एकूण १८ पैकी ३ मंत्रीपदं एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला मिळणे, ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. शिंदे-फडणवीसांच्या पहिल्यावहिल्या कॅबिनेट विस्तारात मुंबई आणि पुण्याच्या वाट्याला अवघे एक मंत्रीपद आले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्याला मंत्रीपदं मिळाली आहेत. तर संपूर्ण पश्चिम विदर्भात यवतमाळमधून संजय राठोड वगळता एकाही जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेले नाही. मंत्रिमंडळातील हा भौगोलिक असमतोल चांगलाच नजरेत भरणारा आहे. मात्र, यासाठी अनेक घटक कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वाधिक ताकद ही शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधूनच मिळाली होती. औरंगाबादसह मराठवाड्यातील बहुतांश शिवसेना आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाला होता. एवढेच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व विधानसभा सदस्यांनी उद्धव ठाकरेंचे शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे गटाचा गंडा बांधला होता. त्यामुळे सद्यपरिस्थितीचा विचार करता औरंगाबाद जिल्हा हा एकनाथ शिंदे गटाची ‘कोअर पॉवर’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साहजिकच आपल्याला भरभरून पाठिंबा देणाऱ्या औरंगाबादच्या प्रेमाची मुख्यमंत्री शिंदे यांनी सव्याज परतफेड केल्याचे दिसत आहे.
दुसरे कारण म्हणजे औरंगाबादकडे नेहमीच महाराष्ट्रातील ‘हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा’ म्हणून पाहिले गेले आहे. एकनाथ शिंदे गटाने भविष्यात प्रखर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर वाटचाल करायचे ठरवले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत कायम हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मतांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होताना दिसले आहे. त्यामुळे शिंदे गटाला औरंगाबादमध्ये चांगले यश मिळू शकते. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवून शिंदे गट २०२४ मधील विधानसभा निवडणुकीसाठीची पायभारणी करू शकतो. याठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वातावरण तापवण्यासाठी शिंदे गटासमोर एमआयएम सारखा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पुढे आणला तर शिंदे गटाला राज्याच्या इतर भागांमध्येही यश मिळण्याची शक्यता आणखी वाढेल. याशिवाय, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यास शिंदे गटाला हक्काची रसद मिळवण्यासाठीचे ठिकाण उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद जिल्हा हा अनेक अर्थांनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network