पाटणा : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना बिहारमध्ये मात्र जेडीयू-भाजप युती तुटणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. भाजपसोबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता नितीश कुमार हे राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू-राजद आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत भाजपसोबत काडीमोड घेण्याच्या निर्णयावर नितीश यांनी शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जात आहे. नितीश कुमार यांच्याकडून या हालचाली सुरू असताना भाजपचे नेतेही सक्रिय झाले असून सरकारमध्ये सहभागी असलेले भाजपचे सर्व मंत्री थोड्याच वेळात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप नेत्यांकडून दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. संजय राठोडांना मंत्रिपदाची लॉटरी कशी लागली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
तेजस्वी यादव यांच्याकडून गृहमंत्रिपदाची मागणी?
लालू प्रसाद यादव यांच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर राजदचे नेतृत्व करणाऱ्या तेजस्वी यादव यांनी नव्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची मागणी केल्याचे समजते. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात सध्या मंत्रिपदाच्या वाटाघाटी सुरू असून याबाबत लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबतचे संबंध ताणले गेल्याचे संकेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने देत होते. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यास व रविवारच्या नीती आयोगाच्या बैठकीस नितीश कुमार अनुपस्थित राहिल्याने नितीश कुमार पुन्हा भाजपसोबतचा घरोबा संपवणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, नितीश यांना करोना संसर्गानंतर आरामाची गरज असल्याचे कारण जेडीयूने दिले होते. त्याचवेळी नितीश इतर जाहीर कार्यक्रमांना मात्र उपस्थित राहात होते.