महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण आणि पर्यटन खात्याची यशस्वीपणे धुरा सांभाळली. एरव्ही पर्यावरण खातं घेण्यासाठी फारसं कुणी इच्छुक नसतं. पण आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडून पर्यावरण खातं मागून त्या खात्यात काम करण्यासाठी पुढाकार दर्शवला. ज्या खात्याकडे कुणाचं फारसं लक्ष जात नव्हतं, त्या खात्याला आदित्य ठाकरे यांनी प्रतिष्ठेचं खातं केलं. तेच प्रतिष्ठेचं खातं आता दीपक केसरकरांकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही अनेकांना उत्कंठा लागून राहिली होती. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात बोलल्याने त्यांच्याकडून शिंदे गटाचं प्रवक्तेपदही काढून घेतल्याची चर्चा होती. तसेच माध्यमांशी बोलण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. या सगळ्या कारणांमुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी केसरकरांवर विश्वास दाखवत त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली. तसेच त्यांना आता आदित्य ठाकरेंचं पर्यावरण खातं देऊन त्यांचं वजनही वाढवलं आहे.
शिंदे गटाच्या कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं जाऊ शकतं?
- एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्रालय
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्रालय
- दादा भुसे – कृषी मंत्रालय
- संजय राठोड – ग्रामविकास मंत्रालय
- संदिपान भुमरे – रोजगार हमी योजना मंत्रालय
- उदय सामंत – उद्योग मंत्रालय
- तानाजी सावंत – उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय
- अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास मंत्रालय
- दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालय
- शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क