नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून १९९५ पासून आजतागायत सलग सहावेळा निवडून गेलेल्या डॉ. विजयकुमार गावितांचे जिल्ह्यावर राजकीय पकड मजबूत राहिली आहे. १९९५ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून गेलेल्या डॉ. विजयकुमार गावितांना तत्कालीन युती शासनात अनेक खात्यांच्या राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. यानंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यानंतर डॉ. विजयकुमार गावितांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्यातील राजकीय प्रतिभा ओळखत शरद पवारांनी त्यांना दिलेल्या पाठबळाने त्यांनी १९९९ ते २०१४ पर्यंत अनेक खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळली.
आदिवासी विकास, पर्यटन, वैद्यकिय शिक्षण, फलोत्पादन अशा विविध खात्याचे मंत्रीपद सांभाळणाऱ्या डॉ. गावितांनी आपली वेगळी छाप आणि कार्यकर्ता वर्गही निर्माण केला. मात्र, आदिवासी विकास विभागात झालेल्या भ्रष्ट्राचार आणि त्यानंतर सीबीआयने केलेली जिल्ह्यातील छापेमारी यामुळे डॉ. गावितांच्या राजकीय जीवनाला काहीसा ब्रेक लागला. भाजपा शिवसेनेने त्यांच्या विरोधात आरोपांचे राण उठवले. अशातच संजय गांधी निराधार योजनेतील गैरव्यवहारात त्यांचे नाव येऊ लागले. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांची मुलगी डॉ. हिना गावितांनी भाजपमध्ये प्रवेश करत नंदुरबार लोकसभा मतदार संघाची निवडणूक जिंकली. त्यानंतर डॉ. विजयकुमार गावितांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१४ पासून तर आजतागायत गावित हे भाजपावासी आहत.
दरम्यानच्या काळात त्यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांच्या चौकशीचे बाऊ करुन त्यांना मंत्रीपदापासून दुर ठेवण्यात आले. तब्बल आठ वर्षांपासून मंत्री पदापासून दूर असलेल्या डॉ. विजयकुमार गावितांची शिंदे मंत्रीमंडळात एन्ट्री झाली खरी मात्र ज्या भाजपाने त्यांच्या विरोधात आरोपांचे राण उठवले त्यांनाच त्यांना मंत्रीपदी विराजमान करावे लागल्याने याबाबत साऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळातच भाजपामधील एका छुप्या गटाने गेली आठ वर्ष डॉ. विजयकुमार गावित मंत्री बनू नये यासाठी प्रयत्नशील राहील्याच्या चर्चा रंगल्या. इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्रीपदासाठी त्यांची मुलगी डॉ. हिना गावित शर्यतीत असताना त्यांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान देखील राज्यातील स्थानिक नेत्यांकडूनच झाल्याचं देखील जिल्ह्यात दबक्या आवाजात बोलले जात होते.
मात्र, डॉ. विजयकुमार गावितांना राजकीय ताकद प्रदान झाल्यास जिल्ह्यात भाजपाची पाळमुळं आणखी घट्ट होतील ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ओळखत त्यांना पुन्हा मंत्री पदाची संधी दिली आहे. मात्र, आता त्यांना पुन्हा आदिवासी खात्याची धुरा दिली जाते की एमडी मेडिसीन असलेल्या डॉ. गावितांना आरोग्य खात्याची धुरा सांभाळायला मिळते हे मंत्री मंडळाच्या वाटपानंतर निश्चित होईलच. मात्र, त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय उत्साह देखील खूप प्रमाणात पाहायला मिळत आहे.