मृतक पूर्वी गृहरक्षक दलात काम करीत होता. गृहरक्षकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला गृहरक्षक दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो रोजमजुरी करीत होता. त्याला दारुचेही व्यसन होते. यामुळे दररोज घरात पत्नीशी खटके उडायचे. एक मुलगा दहावीत शिकत असून दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. अखेर दररोजच्या उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरातच अनिलची गळा आवळून हत्या केली.
मृतक अनिलची त्याच्याच पत्नी व मुलाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुलगाव येथील घरात हत्या केली. त्यांनी रात्रभर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास मलकापूर बोदडसाठी २०० रुपयांत ऑटो केला. दरम्यान, ऑटोचालक चालक प्रशांत भोयर याने हिंगणघाटफैल परिसरात अनिलच्या घरापुढे ऑटो लावला. ऑटोचालकाला यांच्यासोबत काय सामान आहे याची कोणतीही कल्पना नव्हती.आरोपी मनीषा आणि तिच्या मुलाने घरातून एक बैग, मोठी पिशवी आणून ऑटोत ठेवली. चालकाने दोघांनाही अनिलच्या मूळ गावी मलकापूर बोदड येथे त्याच्या वडिलांच्या घरासमोर सोडून दिले. घरातील परिसर मोठा असल्याने त्या पिशव्या एका कोपऱ्यात ठेवल्या. अनिलच्या वडिलांनी विचारणा केली असता जुने कपडे आणल्याचे सांगितले. चक्क वडिलांसमोर पत्नी मनीषा आणि तिच्या मुलाने पोत्यातून अनिलचा मृतदेह त्याच्याच घरापासून काही अंतरावरच जाळला. मात्र, शीर जळाले नसल्याने ते पुलगाव रेल्वेस्थानकसमोरील रेल्वे ट्रॅकवर फेकून देत अपघाताचा बनाव केला.
रेल्वे पोलिसांना शीर सापडल्यावर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. दरम्यान, पुलगाव पोलिसांना हे शीर पुलगावच्या हिंगणघाट फैल परिसरात असणाऱ्या अनिलचा असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी तपास करत विचारपूस सुरु केली आणि ही धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी माहितीच्या आधारे मलकापूर गाठत फॉरेन्सिक चमूच्या मदतीने मृतदेहाची हाडं जमा केलीय. आज मृतदेहाची हाडं जमा करुन ती हाडं फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.या घटनेतील आरोपी मनीषा ही कराटेमध्ये पारंगत होती. तिला कराटेत ग्रीन बेल्टही प्राप्त झाला आहे. मात्र, तिने अल्पवयीन मुलाच्या मदतीने पतीची क्रूर हत्या कशी केली, मृतदेहाचे तुकडे नेमके कसे केले, हे पोलीस तपासात पुढे येणार आहे.