Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास अनेक अर्थाने थक्क करणारी माहिती समोर येते.

 

maharashtra cabinet expansion

हायलाइट्स:

  • १८पैकी १२ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद
  • एक दहावी पास, एकास डॉक्टरेट
  • संदिपान भुमरे सर्वांत ‘गरीब’ मंत्री
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास अनेक अर्थाने थक्क करणारी माहिती समोर येते. १८ मंत्र्यापैकी जवळपास १२ मंत्र्यांवर राजकीय; तसेच गुन्हेगारी स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार कोट्यधीश असून, यामध्ये सर्वाधिक ४४१ कोटी रुपयांची संपत्ती ही भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे, तर सर्वांत कमी २ कोटी रुपयांची संपत्ती ही शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री दहावी पास आहे, तर एका मंत्र्याने डॉक्टरेट मिळवली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळविस्तार मंगळवारी पार पडला. या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री कोट्यधीश आहेत. यातील सर्वाधिक संपत्ती मलबार हिलचे आमदार असलेले भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावावर आहे. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या लोढा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सहा वेळा आमदारकी भूषविणाऱ्या लोढा यांच्याकडे २५२ कोटी रुपयांची चल तर १८९ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. याशिवाय दक्षिण मुंबईत लोढा यांचे पाच फ्लॅट आहेत. लोढा यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विजयी झालेले एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्याकडे लोढा यांच्या खालोखाल ११५ कोटींची संपत्ती आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर सावंतवाडीचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. त्यांच्याकडे ८२ कोटींची संपत्ती आहे. तर २ कोटी रुपयांची संपत्ती असलेले शिंदे गटाचे पैठणमधील आमदार असलेले संदीपान भुमरे हे या मंत्रिमंडळातील सर्वांत ‘गरीब’ मंत्री आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. याशिवाय भाजपच्या विजय गावित यांच्याकडे २७ कोटी, गिरीश महाजन यांच्याकडे २५ कोटी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे २४ कोटी, अतुल सावे यांच्याकडे २२ कोटी, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ११ कोटी, तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांच्याकडे २० कोटी, शंभुराज देसाई यांच्याकडे १४ कोटी आणि दादा भुसे यांच्याकडे १० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची प्रतिज्ञापत्रात नोंद आहे.

दहावी उत्तीर्ण ते डॉक्टरेट

नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दहावी पास आहे, तर पाच मंत्री बारावी पास आहेत. याशिवाय एक मंत्री इंजिनीअर, सात मंत्री पदवीधर तर दोन मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. एका मंत्र्याने डॉक्टरेट मिळवलेली असून, भाजपचे मीरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च विद्याविभूषित आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here