‘स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे?’
आमदार आणि खासदारांसह पक्षातून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभं राहावं लागलं होतं. या घटनेवरूनही शिवसेनेनं शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘पुन्हा विश्वासघाताची उडी मारूनही ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत त्यांचे समाधान कसे करणार? इकडे काय किंवा तिकडे काय ते असंतुष्टच राहणार आहेत. यातले अनेक जण ‘ईडी’च्या भयाने कातडी वाचविण्यासाठी बेइमान झाले. त्यांना सर सलामत राहिले याच लेनदेनवर दिवस ढकलावे लागतील. मात्र त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा कलंक कधीच पुसला जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे? महिनाभरात त्यांना दिल्लीत सात हेलपाटे मारावे लागले तेव्हा कोठे काल मंत्रिमंडळाचा विस्तार ते करू शकले. शिंदे दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत गेले. बैठक संपल्यावर ‘टीम इंडिया’चा म्हणून पंतप्रधानांबरोबर सामुदायिक फोटो प्रसिद्ध झाला, तो स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच्या छायाचित्रात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे तिसऱ्या रांगेत उभे आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. दिल्लीच्या दरबारात औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे करताच छत्रपतींचा स्वाभिमान जागा झाला व ते ताडकन दरबारातून बाहेर पडले. शिवरायांना अटक झाली, पण त्यांनी दिल्लीच्या बादशाहीपुढे मान तुकवली नाही. हा इतिहास आम्ही पिढय़ान्पिढय़ा सांगत आहोत. त्या इतिहासाचे साफ मातेरे आजच्या मुख्यमंत्र्यांनी केले. महाराष्ट्राला स्वतःचा एक मान आहे. बाकी सर्व राज्ये आहेत. महाराष्ट्रात ‘राष्ट्र’ आहे व त्या शिवरायांच्या राष्ट्रास दिल्लीने मागच्या रांगेत उभे करून शिंदे यांना त्यांच्या मांडलिकत्वाची जाणीव करून दिली. अशा या मांडलिक राजाचे मंत्रिमंडळ सत्तेवर असले काय किंवा नसले काय, राज्याला काय फरक पडणार?’ अशा शब्दांत शिवसेनेनं आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या आरोपांवर नवनिर्वाचित मंत्र्यांकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.