कल्याण : ठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. पक्ष नेतृत्वाकडून निष्ठेबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने अपमानित होऊन राहण्यापेक्षा शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुखपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आपण राजीनामा देत असल्याची घोषणा प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या घोषणेचे ठाणे ग्रामीणमध्ये पडसाद उमटणार असून शिवसेनेचे इतर अनेक पदाधिकारीही पाटील यांच्या निर्णयाने व्यथित झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेना खिळखिळी झाली आहे. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यात माझा कोणताही सहभाग नसताना पक्षनेतृत्वासह पदाधिकारी यांनी संशय व्यक्त करत अविश्वास दाखवण्यास सुरुवात केली आहे, असं प्रकाश पाटील यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारामुळे मी व्यथित आहे, असंही ते म्हणाले.

शिंदे गटात प्रवेश करणार का, या प्रश्नावर मी संघटनेत केलेल्या कामाचे महत्व ओळखून कोणी आपणास विचारणा केली तर भविष्यात त्याबाबत निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेकडून शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारा दावा

दरम्यान, तब्बल ३५ वर्षे शिवसेना संघटनेत मी शाखाप्रमुख ते जिल्हा प्रमुखपदापर्यंत काम करत आहे. पक्षसंघटना वाढीसाठी निस्वार्थ प्रयत्न केले. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून मला खड्यासारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू करत आहेत. त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्यापेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here