भावाला कॉल केल्याच्या कारणातून पत्नीला मारहाण
प्रीती आणि विजयकुमार या दाम्पत्याने सोमवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गावातील महादेव मंदिरात येऊन अभिषेक घातला. सोमवारी दुपारी प्रीतीने भाऊ मल्लिनाथ (रा. हत्तुर ता. दक्षिण सोलापूर) याला फोन केला होता. यावरून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वाद विकोपास जाऊन विजयकुमार याने प्रीतीला चाबकाने व चपलेने मारहाण करून धमकी दिली होती. धमकी देऊन तो जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेला.
मुलगा थोडक्यात वाचला
पतीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रीतीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलगी आरोही (वय, ३ वर्ष) आणि मुलगा बसवराज (वय, दीड वर्ष) यांना राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगा बसवराज याला गळफास व्यवस्थित न बसल्याने त्याचा जीव वाचला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मयत प्रीतीचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे (रा. हत्तुर ता. दक्षिण सोलापूर) याने विजयकुमार माळगोंडे हा माझ्या बहिणीस सतत शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने तिने आत्महत्या केली आहे, अशा प्रकारची फिर्याद कामती पोलीस ठाणे येथे दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे.