मुंबई : विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मागील महिनाभरापासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर काल पार पडला. यावेळी शिंदे गट आणि भाजपमधील एकूण १८ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील सरकारमधून बाहेर पडलेल्या अपक्ष आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळत कडू यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर बच्चू कडू हेदेखील त्यांच्यासोबत गुवाहाटी येथे निघून गेले. शिंदे यांनी केलेलं बंड यशस्वी झालं आणि त्यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर अपक्ष आमदारांनाही ‘अच्छे दिन’ येतील असं बोललं जात होतं. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या काही बंडखोरांना मंत्रिपदाची लॉट्री लागली असली तरी अपक्ष आमदारांच्या हाती मात्र निराशा आली आहे.

नितीश कुमार यांनी अचानक भाजपला का सोडले; प्रशांत किशोर यांचा हात होता? स्वत: दिले उत्तर

मंत्रिमंडळ विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला स्थापन देण्यात आलेलं नाही. त्यामुळे नाराज झालेले बच्चू कडू हे राजभवनातील शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहता विधिमंडळात गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच अपक्षांशिवाय हे सरकार चालणार नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सूचक इशाराही दिला आहे. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल की पुन्हा राज्यमंत्रिपदावरच बोळवण केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar on Nitish Kumar: भाजप मित्रपक्षांना कसं संपवतो, शरद पवारांनी सांगितली थिअरी

राज्यात अपक्षांना चांगले दिवस येणार असून प्रहारचा मुख्यमंत्री होईल, असं काही महिन्यांपूर्वी म्हणणाऱ्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा राज्यमंत्रिपदाचीच जबाबदारी देण्यात आली तर तो बच्चू कडू यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण शिंदे यांच्या बंडावेळी बच्चू कडू यांनी उघड भूमिका घेत शिंदेंचं जोरदार समर्थन केलं होतं. अशा स्थितीत पुन्हा राज्यमंत्रिपदच मिळालं तर बंड करून नेमका फायदा झाला तरी काय, असा प्रश्न कडू यांच्यासमोर निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आगामी काळात बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळतं का आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here