bjp devendra fadanvis, खातेवाटपाआधी देवेंद्र फडणवीसांची गुगली; सर्व अंदाज चुकणार असल्याचा दावा – all predictions regarding maharashtra minister portfolio will be incorrect says bjp leader and dy cm devendra fadnavis
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारानंतर आता कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते दिले जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कमी आमदार असतानाही भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्याने मंत्रिमंडळात इतर वजनदार खाती आपल्याकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर खातेवाटपाबाबत विविध माध्यमांमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एका मराठी दैनिकाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी खातेवाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी गुगली टाकली आहे. ‘खातेवाटप तर माध्यमांनीच करून टाकलं आहे. आता आमच्यासाठी खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही. मात्र तुम्ही जे खातेवाटप केलं आहे ते सपशेल चुकीचं ठरणार आहे, एवढंच सांगतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे. Cabinet Portfolios: युद्धात जिंकलं पण तहात गमावलं! मलाईदार खाती भाजपला, शिंदे गटाच्या आमदारांना जुनीच खाती?
भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होणार?
देशात गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विविध राज्यांमध्ये धक्कातंत्राचा वापर केला जात आहे. अनेक राज्यांमध्ये ऐन निवडणुकीआधी मुख्यमंत्र्यांसह अख्खंच्या अख्खं मंत्रिमंडळच बदलण्यात आल्याचं याआधी पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीला दोन ते अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक असताना महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातही भाजपकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला जाऊ शकतो. त्यामुळे गृह, अर्थ आणि महसूल यांसारखी महत्त्वाची खाती नक्की कोणाकडे दिली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.