संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना सोडून इतरांना भेटीसाठी परवानगी घ्यावी लागेल असं सांगण्यात आलं. सुनील राऊत यांनी तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांच्याकडे संजय राऊत यांना वायचळ यांच्या कार्यालयात भेटू द्यावं अशी विनंती केली. मात्र तीदेखील फेटाळण्यात आली. इतर कैदी ज्याप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांना भेटतात, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भेटला येईल, असं संजय राऊत यांना सांगण्यात आलं.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयानं संजय राऊत यांच्या घरावर ३१ जुलैला छापा टाकला. दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २२ ऑगस्टपर्यंत त्यांचा मुक्काम ऑर्थर रोड कारागृहात असेल. राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीनं त्यांच्या पत्नी वर्षा यांना समन्स बजावलं. राऊत पती-पत्नीची ईडीनं समोरासमोर चौकशी केली.