हिंगोली: वन्य प्राण्यांमुळे शेतकरी तर त्रस्त झालाच आहे. परंतु या वन्य प्राण्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. रानडुक्कर, नीलगाय, हरिण, काळवीट हे वन्य प्राणी रस्ता ओलांडत असताना त्यांना अनेकदा वाहनांची धडक बसली आणि अपघात झाले. हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर देऊळगाव पाटीजवळ निलगायीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.

शेख तौसिफ अब्दुल कादीर (३३) असे मृत शिक्षकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी शिक्षकावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पुसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले शेख तौफिक व त्यांचे सहकारी शेख फईम शेख रहीम हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी साडेनऊ वाजता हिंगोलीकडून पुसेगावकडे शाळेसाठी जात होते. त्यांची दुचाकी देऊळगाव पाटीजवळ आली असता, रस्ता ओलांडत असलेल्या निलगायीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
तरुण जमले, उत्साहात सत्कार; संभाजीराजेंचा गुलाल लावून घेण्यास नकार; नेमकं काय घडलं?
या अपघातामध्ये दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र शेख तौसिफ यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख फईम यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल मस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here