उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिवसेना पक्ष काढून घेण्याच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने निर्णायक पाऊल उचलले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात एकनाथ शिंदे गटाने आपल्यालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ‘शिवसेना कोणाची?’ या प्रश्नावरून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात असणारी लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचली आहे. हा शिवसेनेसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांकडून आम्हीच खरी शिवसेना, धनुष्यबाण आमचाच, असे दावे केले जात आहेत. शहाजीबापू पाटील तर जिथे जातील तिथे धनुष्यबाण आमचाच म्हणून सांगत आहेत.
उद्धव ठाकरेंनी कोणतं चिन्ह घ्यायचं? शहाजीबापूंचे २ पर्याय
“धनुष्यबाण आमचा आहे.. तो आम्हाला मिळणारच आहे.. आमचा फॉर्म धनुष्यबाण म्हणून लिहून ठेवलाय आम्ही… ठाकरे गटाने त्यांचे फॉर्म कशावर भरायचे, हे आता उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं…त्यांना देखील वाईट वाटायचं काही कारण नाहीये. उगीच भांडत बसलेत… धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना,,, उद्धव ठाकरेंनी ढाल तलवार घ्यायची…शस्त्र काय कमी आहेत होय…? लागतील एवढी शस्त्र आहेत.. घ्या कुठलं पण लागा तयारीला.. उतरा मैदानात”, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
आमदारांनी शिवसेना सोडली नाही
पक्षात राहून आवाज उठवणं म्हणजे बंड नाही. जर पक्षातील आमदारांना आपला नेता बदलायचा असेल तर त्यात चुकीचं ते काय?, असा सवाल उपस्थित करत पक्षातून बाहेर पडल्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा लागू होतो, पण शिंदेसोबतचे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीयेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली नाही, ना त्यांच्यासोबतच्या आमदारांनी सेना सोडली, जर दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी केली तर तर पक्षांतरबंदी कायदा लागू होते. दुसऱ्या पक्षात गेलं तरच बंडखोरी म्हणता येते, असा जोरदार युक्तीवाद करत १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊच शकत नाही, असा महत्त्वाचा मुद्दा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिला आहे. शिवसेना कुणाची, शिवसेनेचा सरसेनापती कोण, यावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली.