काल मंत्रिमंडळाचा विस्तार आटपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील पुण्याकडे रवाना झाले. शिरुरला जाऊन त्यांनी माजी आमदार, ज्येष्ठ भाजप नेते बाबुराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर ते बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहोचले. कालच्या दिवसभरातील दगदगीमुळे त्यांचं नीटसं जेवण झालं नव्हतं. बाळासाहेब चव्हाण यांच्या घरी त्यांनी फक्कड जेवणावर ताव मारला. चव्हाण कुटुंबियांचा निरोप घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना शिक्रापूरच्या ग्रामस्थांनी गराडा घातला.
सगळ्या राज्यात फेमस असलेल्या बावळेवाडीच्या शाळेचा विषय तेथील ग्रामस्थांना उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घालायचा होता. तेथील एक पुढारी हाच विषय फडणवीसांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात चंद्रकांत पाटील त्यांना म्हणाले, “तुम्ही आता पुढे व्हा अन बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी…”
चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा रोख तेथील अनेकांच्या लक्षात आला. ज्यांना चंद्रकांत पाटील यांना इशारा कळला, त्यांनी दादांकडे स्मितहास्य करुन पाहिलं. दादांनीही चेहऱ्यावर हसू आणत, होय… होय… फडणवीसच पुण्याचे पालकमंत्री असतील असं म्हणत आपल्या स्वत:च्याच बोलण्याला एकप्रकारे दुजोरा दिला.
फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचे आता काऊंटडाऊन सुरू झालंय
दरम्यान, वाबळेवाडीच्या शाळेचं नाव स्व. अटलबिहारी वाजपेयी असल्याने ती संघाची शाखा आहे, असं पसरवलं गेलं. तसेच महाविकास आघाडी सरकारने सूडाच्या भावनाने याकडे पाहिलं, अशी तक्रार शिक्रापूर ग्रामस्थांनी फडणवीसांच्या कानावर घातली. त्यावर राष्ट्रवादीचे आता काऊंटडाऊन सुरु झालंय, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या इशाऱ्याची देखील शिक्रापूरमध्ये जोरदार चर्चा होती.
राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्वत: फडणवीस पुण्याच्या पालकमंत्रिपदी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या आगामी निवडणुका व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्वत: फडणवीस पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणार, असा एकंदर चर्चेचा सूर होता. तो सूर आता खरा ठरताना दिसून येत आहे.