अहमदनगर : जिल्ह्यातील दुर्गम भागात राहून देशी बियाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मानलेल्या भावाला अर्थात भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना खास देशी बियांणापासून बनवलेल्या राख्या भेट म्हणून पाठवल्या आहेत. अकोले तालुक्यातील कोंभाळणेसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचे संवर्धन केलं आहे. त्यांचे संशोधन इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी घरातच एका जुनाट खोलीत बीजबँक स्थापन केली. त्यांचे कार्य बायफ या संस्थेने जगासमोर आणले आणि तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंच्या कामाची दखल घेतली. चंद्रकांत पाटील यांनी मार्च २०१९ मध्ये अवघ्या ४० दिवसात राहीबाई यांना नवीन आणि पक्की बीजबँक बांधून दिली. उद्घाटनाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांनी राहीबाईंचा उल्लेख बहीण म्हणून केला. तेव्हापासून राहीबाई या चंद्रकांत पाटलांना आपला भाऊ मानतात.

राहीबाई यांना नारीशक्तीसह देशातील प्रतिष्ठित अशा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. राहीबाई आणि चंद्रकांत पाटील हे मागील दोन वर्षांत करोना संकट आणि कामातील इतर व्यस्थतेमुळे एकमेकांना भेटू शकले नाहीत. मात्र त्यांच्यातील भावा-बहिणीचा जिव्हाळा कमी झाला नसल्याचे उदाहरण या रक्षाबंधनानिमित्त बघायला मिळालं आहे.

बिहारमध्ये उलथापालथ होताच शिवसेना प्रचंड आशावादी; २०२४ च्या निवडणुकीबाबत मोठा दावा

यावर्षी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खास देशी बियाणांपासून ‘बीज राखी’ बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट दिली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतलं आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्या आहेत. सुरेख दिसणाऱ्या या बीज राख्यांची निर्मिती करून, त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिलं आहे.

दरम्यान, कुठलंही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते, हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त त्यांनी सर्व देशबांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रकांत पाटील आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यांच्या पद्मश्री बहिणीने म्हणजेच राहीबाईंनी पाठविलेल्या अनोख्या भेटीने त्यांचा आनंद आणखी द्विगुणित होईल एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here