मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बिदरकडे जाणाऱ्या सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसचे (२२१४३ ) डबे बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निखळले. विद्याविहार स्थानकाजवळ ही घटना घडली. इंजिनपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे डबे संपूर्ण गाडीपासून वेगळे झाले. काही फूट अंतरावर गेल्यानंतर हा प्रकार लोकोपायलटच्या लक्षात आला आणि त्यानंतर त्याने तातडीने इंजिन थांबवले.
निखळलेले डबे जोडून सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बिदर एक्स्प्रेस गंतव्य स्थानकासाठी रवाना करण्यात आली. या अपघातामुळे रात्री उशीरा धावणाऱ्या जलद लोकल सुमारे पाऊण तासाहून अधिक काळ विलंबाने धावत होत्या.
दरम्यान, या घटनेनंतर लांब पल्ल्यावर धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसची तपासणी करणाऱ्या रेल्वे विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.