या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपक्रम कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोले, पंचायत समिती गडचिरोलीचे गटविकास अधिकारी बीएस साळवे कृषी अधिकारी पीपी पदा आदी उपस्थित होते.
१० ऑगस्ट रोजी महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गडचिरोलीमधील अंगणवाडी केंद्र पारडी कुपा इथे किशोर संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः उपस्थित लावली. गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांना आरोग्य व पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील धानोरा, अहेरी, भामरागड व एटापल्ली या चार अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यांतील १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. त्यावर मात करण्यासाठी मोहफुलपासून तयार केलेले लाडू वाटप करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर चार तालुके घेतले असलेतरी पुढे सर्वच तालुक्यात बालविकास विभागामार्फत हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोले यांनी दिली आहे.