घर आणि कार्यालयांमध्ये काहीच सापडलं नाही, मात्र फॉर्म हाऊसमध्ये आढळले घबाड
जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळाली. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवर आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यानंतर या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला.
दरम्यान, फार्म हाऊसवर कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली आहे.