Jalna IT Raid: जालन्यात ३ ऑगस्टला आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत ५८ कोटींची रोख रक्कम, ३२ किलो सोनं अशी एकूण ३९० कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे. आयकर विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर ५ दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते. या छापेमारीतच काही दस्तावेज, ३२ किलो सोनं, ५८ कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्यानं खळबळ उडाली आहे. सूंदरलालजी सावजी बँक, एस आरजे पित्ती स्टील, इलेक्ट्रॉनिकस प्रतिष्ठाने, फायनान्सर विमलराज सिंघवी, डीलर प्रदीप बोरा यांच्या घरासह कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती आहे.

३९० कोटींची मालमत्ता जप्त

राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात सुमारे ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस (Jalna IT Raid) आली. रोख रक्कम, सोनं, सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज तसंच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. ही छापेमारी अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.

रक्कम मोजण्यासाठी १३ तास

विशेष म्हणजे ही रोख रक्कम मोजण्यासाठी पथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकारी – कर्मचारी, १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. जालनातल्या चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचं जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. त्यानंतर एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली.

रोख रक्कम मोजण्यासाठी १० ते १२ मशीन्सचा वापर

या व्यावसायिकांच्या घरांवर, कार्यालयांवर, स्टील कारखान्यांवर छापे टाकले. त्यावेळी सुरुवातीला काहीच मिळालं नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शहराबाहेरील फार्महाऊसवर धाडी टाकला. फार्महाऊसवर गाद्यांमध्ये, पिशव्या, कपाटांखाली, अडगळीत रोख रक्कम सापडली. तसंच जमिन, शेती, बंगल्याची बँकेतील कागदपत्रं, इतर ठेवी, तसंच इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. छापेमारीत सापडलेली ही रोख रक्कम जालन्यातील स्टेट बँकेत मोजण्यात आली. सकाळी ११ पासून ते रात्री १ वाजेपर्यंत रोख रक्कम मोजण्याचं काम सुरू होतं. यासाठी १० ते १२ मशीन्सचा वापर करण्यात आला होता.

औरंगाबादमध्ये धाडसत्र

जालन्यासह औरंगाबादमध्येही अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिकांवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत ५८ कोटी रोख रक्कम, १६ कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे, ३०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली. इतकी रोख रक्कम मोजण्यासाठी १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट दरम्यान ही कारवाई करण्यात आली. २६० अधिकारी-कर्मचारी, १२० हून अधिक वाहनांचा ताफा यासाठी होता. जालन्यासह औरंगाबादमधील ही छापेमारीही अतिशय गुप्तरित्या करण्यात आली होती. आयकर खात्याकडून ही महत्त्वाची कारवाई पार पडली.

दुल्हन हम ले जायेंगे

गुप्त छापेमारीवेळी कोणालाही याबाबत समजू नये यासाठी अधिकाऱ्यांनी छापा टाकताना सतर्कता बाळगली होती. छापेमारीवेळी ज्या वाहनांचा ताफा वापरण्यात आला होता त्यावर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर्स लावण्यात आले होते. राहुल वेड्स अंजली असे स्टिकर्स गाड्यांवर लावण्यात आले होते. अजय देवगनच्या ‘रेड’ स्टाइलमध्ये जालन्यात छापेमारी करण्यात आली. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर वधू-वराच्या नावाचे स्टिकर लावले होते. तसंच कोडवर्डचाही वापर करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here