मुंबई: बॉलिवूडप्रमाणेच आता मराठीतही बोल्ड कंटेट असणारे सिनेमे प्रदर्शित होऊ लागले आहे. असाच बोल्ड कंटेट २०१९ साली आलेल्या ‘टकाकट’ या सिनेमात पाहायला मिळाला होता.द्विअर्थी विनोद आणि बोल्ड कंटेट अशा धाटणीचा हा सिनेमा आहे. आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून, टकाटक २ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Takatak 2 Teaser Out) आला आहे. टकाटक २ च्या टीझरनंतर आता ट्रेलरही काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या सिनेमाच्या ट्रेलरपेक्षा या सिनेमात अजिंक्य राऊतने दिलेल्या किसिंग सीनची सर्वाधिक चर्चा होत आहे.
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अजिंक्यने रावडी पण सभ्य असणाऱ्या अशा इंद्राची भूमिका साकारली होती. अचानक तो बोल्ड कंटेट असणाऱ्या सिनेमात दिसत असल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने दिलेला किसिंग सीन पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला आहे.
अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर देखील हा ट्रेलर शेअर केला आहे. सोशल मीडियावर जितके त्याचे पहिल्या-वहिल्या सिनेमासाठी कौतुक होत आहे, तेवढेच त्याला टीकेचा धनी देखील व्हावे लागले आहे. ‘अजिंक्यकडून अशी अपेक्षा नाही’ अशा आशयाच्या कमेंट्स चाहते करत आहेत.
एका चाहत्याने कमेंट करत विचारलं आहे की, ‘परिवारासोबत हा चित्रपट कसा पाहायचा? दर्जाहीन चित्रपट आहे. तुमचा असा समज झाला आहे की चित्रपटामध्ये अश्लिलता घेतली की चित्रपट हिट होतो. महाराष्ट्राची ओळख संस्कृतीला कलंक लागेल असे चित्रपट बनवू नका’. आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘तू ग्रेड १ उत्तम अभिनेता आहेस. स्वत:ची प्रतीमा खराब होणार नाही याची काळजी घे. चांगल्या आणि दर्जेदार चित्रपटांची निवड करावीस अशी अपेक्षा आहे’. एकाने कमेंट करत अजिंक्यच्या किसिंग सीनला हॉरिबल म्हटलं आहे.

अनेकांनी त्याच्या पहिल्या सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या असून हा ट्रेलर ‘पैसा वसूल’ असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी या सिनेमाबाबत उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
हे वाचा-करिना कपूरनं केलं वहिनीचं कौतुक, आलियाच्या प्रेग्नन्सीवर काय म्हणाली अभिनेत्री ते पाहा
टकाटक हा सिनेमाची त्यातील बोल्ड कंटेट आणि डायलॉग्समुळे विशेष लोकप्रिय ठरला होता. सोशल मीडियावरही यातील काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. टकाटक २ मध्ये देखील असेच घडणार आहे, मात्र सिनेमाला एक भावुक अँगल देण्याचा प्रयत्नही मेकर्सनी केला आहे. या सिनेमात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे अशी स्टारकास्ट असणार आहे.