Long Weekend Destinations Near Mumbai: ऑगस्ट महिन्यात १३ ते १६ पर्यंत लाँग वीकेंड आहे. या वीकेंडला अनेकांनी कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार केला असेल. मुंबई, पुण्यापासून जवळच्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. मुंबईपासून काही अंतरावर लाँग वीकेंडसाठी (Weekend Gateways) अतिशय सुंदर ठिकाणं आहेत. इथे तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. तसंच काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खेळायचे असल्यास अशा ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता. कर्नाळा, खंडाळा, लोणावळा अशा मुंबईपासून आसपासच्या ठिकाणी काही टूरिस्ट पॉईंट्स आहेत, जिथे तुम्ही सुट्ट्यांचा आनंद, वीकेंडची मजा घेऊ शकता. या ठिकाणी बाय रोड जाण्यासाठी जवळपास ३ तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो. पावळ्यात या ठिकाणी तुम्ही तुमचा लाँग वीकेंड एन्जॉय करू शकता.

कर्नाळा

तुम्हाला वीकेंड मुंबईपासून एखाद्या जवळच्या ठिकाणी घालवायचा असेल, तर एक चांगला पर्याय आहे. कर्नाळ्याला (Karnala) तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यातली बहरलेली हिरवळ आणि इतर प्रेक्षणीय स्थळं तुम्ही इथे पाहू शकता. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. १४७ हून अधिक प्रजातीचे पक्षी इथे असल्याची माहिती आहे. १२ किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य पसरलं असून मुंबईच्या गजबजाटातून तुमच्या वीकेंडसाठी हे ठिकाण नक्कीच उत्तम ठरेल. या अभयारण्यातच कर्नाळा किल्ला आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगची आवड असल्यास इथे हा पर्यायही उपलब्ध आहे. मुंबईपासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे.

भंडारदरा

मुंबईपासून जवळ असलेलं भंडारदरा (Bhandardara) हे ठिकाण वीकेंडसाठी एक उत्तम स्पॉट (Long Weekend Spot) ठरू शकतो. भातशेती, धबधबे, तलाव, धरणं, डोंगर-टेकड्यांमुळे ट्रेकर्ससाठीही वीकेंड घालवण्यासाठीची उत्तम जागा ठरू शकते. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये (Sahyadri) वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी विल्सन डॅम, आर्थर लेक, अंब्रेला फॉल्स अशी आकर्षणं आहेत. मुंबईपासून लांब निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही इथे सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. भंडारदरा मुंबईपासून जवळपास १६५ किलोमीटरवर आहे.

कोलाड

कोलाड (Kolad) रायगड जिल्ह्यात आहे. या सुट्ट्यांमध्ये काही ॲडव्हेंचर करायचं असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. पांढरेशुभ्र धबधबे, खोल दऱ्या, सह्याद्री पर्वतरांगा अशा नयनरम्य गोष्टी पाहण्यासह इथे स्पोर्ट्सचाही आनंद घेता येईल. ताम्हणी घाट, देवकुंड धबधबा, तळाचा किल्ला, कुडा मंदाड लेणी, घोसाळा किल्ला अशा ठिकाणी भेट देऊ शकता. तसंच वॉटर राफ्टिंग, कयाकिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, ट्रेकिंग असे अनेक स्पोर्ट्स ॲडव्हेंचर इथे करता येतील. मुंबईपासून जवळपास ११४ किलोमीटरवर कोलाड आहे.

दूरशेत

तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत वीकेंड प्लॅन करत असाल, तर मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या दूरशेतला (Durshet) भेट देऊ शकता. कोलाडप्रमाणेच इथेही तुम्ही ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अंबा नदीच्या काठाच्या पसरलेल्या या लहानशा गावात तुम्ही सरसगड ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, कुंडलिका नदीवर कायकिंगचा आनंद घेऊ शकता. त्याशिवाय पाली आणि महाड गणपती मंदिर, पाली किल्ल्यालाही भेट देऊ शकता. मुंबईपासून ७६ किलोमीटरवर हे वीकेंडसाठीचं हटके ठिकाण आहे.

सापुतारा

तुमच्या लाँग वीकेंडचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पश्चिम घाटातील सापुतारा (Saputara) या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. अल्लाददायक हवा, मुंबईच्या गोंगाटातून शांत ठिकाणी फिरायचं असल्यास हा परफेक्ट स्पॉट ठरू शकतो. हतगड किल्ला, आर्टिस्ट व्हिलेज, सनराइज अँड सनसेट पॉइंट, सापुतारा तलाव अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर हा काळ सापुतारामध्ये भेट देण्यासाठी चांगला काळ ठरतो. सापुतारा मुंबईपासून २४८ किलोमीटरवर आहे.

माळशेज घाट

पावसाळ्यात कुठे जायचं याचा प्लॅन करत असाल, तर माळशेज घाट (Malshej Ghat) परफेक्ट ठरेल. धबधबे, दऱ्या, नद्या, धुकं, शुद्ध हवा, अल्हाददायक वातावरण अशा अनेक निसर्गरम्य गोष्टींचा आनंद इथे घेऊ शकता. पावसाळ्यात फ्लेमिंगोसह इतरही विविध पक्ष्यांच्या प्रजाती इथे मोठ्या संख्येने येतात. याशिवाय माळशेज घाटात तुम्ही माळशेज धबधबा, आजोब हिल किल्ला, पिंपळगाव जोगा धरण, प्राचीन मंदिरं, किल्ले, गुहा असे अनेक ट्रेकिंग ट्रेल्सही आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातल्या या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी जुलै ते ऑगस्ट हा काळ चांगला ठरतो. मुंबईपासून जवळपास १२६ किलोमीटरवर माळशेज घाट आहे.

अलिबाग

तुमच्या सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद (Long Weekend) घेण्यासाठी अलिबाग (Alibaug) परफेक्ट स्पॉट ठरू शकतो. इथे तुम्ही बसने किंवा कारने जाण्याऐवजी फेरीनेही प्रवास करू शकता. अलिबागमध्ये कुलाबा किल्ल्याला भेट देऊ शकता. नागाव, काशिद, वर्सोली, अक्षी, कुलाबा, मांडवा अशा अनेक समुद्रकिनारी तुम्ही सुट्ट्या घालवू शकता. इथे फणसाड अभयारण्यालाही भेट देऊ शकता. तसंच बोटिंग इतरही स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. मुंबईपासून जवळपास ९२ किलोमीटरवर अलिबाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here