औरंगाबाद: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात औरंगाबादला झुकतं माप देण्यात आलं. भाजप आणि शिंदे गटाने १८ मंत्र्यांना संधी दिली. यामधील तीन मंत्री एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. त्यातही शिंदे गटाने औरंगाबादच्या चार आमदारांपैकी दोघांना मंत्री केलंय. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे औरंगाबादवर वर्चस्व राखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंमध्ये संघर्ष सुरू आहे.

शिंदे यांच्या गटात गेलेले आणि ठाकरेंवर सातत्यानं शिरसंधान साधणारे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी दिसूनही आली आहे. त्यात ठाकरे गटाने आता संजय शिरसाटांना डिवचलंय. बंडखोरीनंतर संजय शिरसाट यांना औरंगाबादमध्ये नडणाऱ्या अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी पुढे केलंय.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सध्या औरंगाबादमधले जे तीन मंत्री आहेत, त्यात दोघे शिंदे गटातले आहेत. पैठणचे आमदार संदिपान भुमरे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही शिंदेंनी मंत्री करण्यात आलं आहे. ज्या औरंगाबादमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटात तीव्र संघर्ष आहे, तिथे या दोन मंत्र्यांना उत्तर म्हणून काही तरी निर्णय घेणं भाग होतं. कारण ठाकरे गटातले शिवसैनिक आणि नेत्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. उद्धव ठाकरेंना यासाठी अंबादास दानवेंची निवड केली आणि त्यांना विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता केलं. ज्या दानवेंना ठाकरेंनी संधी दिलीय, ते दानवे एकेकाळी वादग्रस्त राजकारणामुळे चर्चेत असायचे आणि त्यांच्यावर शिवसेनेला निलंबनाची कारवाईही करावी लागली होती.
संजय राठोडांना मंत्रिपद, पूजा चव्हाणच्या आजीचा संताप, म्हणतात लाज आणणारा…
अंबादास दानवेंचा राजकीय प्रवास
भाजपमधून बाहेर पडल्यानंतर दानवे यांनी १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २००० साली नगरसेवक म्हणून ते अजबनगर येथून निवडून आले. वादग्रस्त प्रकरणात पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे राजीनामाही द्यावा लागला. चार वर्षे पक्षात फक्त शिवसैनिक म्हणून काम करताना त्यांनी संयम राखला. ऑक्टोबर २००४ मध्ये प्रभारी जिल्हाप्रमुख पदाच्या रुपाने निष्ठेचं फळ मिळालं.

२० वर्षांच्या राजकारणात दानवेंना महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा अनुभव आहे. पक्षनिष्ठेचं फळ म्हणून विधानपरिषदेवरही त्यांना संधी देण्यात आली. दानवेंना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ‘मातोश्री’वरून त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. शिवसेनेने औरंगाबादमधला मराठा नेता म्हणून दानवेंना पुढे आणलं. २०१४ मध्ये त्यांना गंगापूरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पण त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांना लोकसभा लढवायची होती. मात्र विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच तिकीट देण्यात आलं.
सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडणार; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा इशारा
बंडखोरीनंतर औरंगाबादमध्ये अंबादास दानवे विरुद्ध संजय शिरसाट असा संघर्ष पाहायला मिळाला. दानवेंनी संजय शिरसाटांवर जहरी टीका केली आणि ठाकरेंना साथ दिली. जिल्ह्यातल्या राजकारणात ठाकरेंकडून कायमच अंबादास दानवेंना झुकतं माप देण्यात आलं. यावेळीही ते ज्या संजय शिरसाटांना नडले, त्यांच्या जिव्हारी लागेल असा निर्णय घेण्यात आला. इकडे संजय शिरसाटांची संधी हुकली आणि तिकडे ठाकरेंनी दानवेंना विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता केलं. औरंगाबादमध्ये परतल्यानंतर दानवेंचं जंगी स्वागतही करण्यात आलं.

औरंगाबादचं राजकारण शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षामुळे गाजणार आहे. कारण, दोन्ही बाजूला दिग्गज नेत्यांची फौज आहे आणि महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यातच औरंगाबाद लोकसभेची जागाही जिंकण्याचं आव्हान यावेळी शिवसेनेसमोर असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. विशेष म्हणजे इथे एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. त्यांनी खैरे यांच्यावर निसटता विजय मिळवला.

तीन मंत्र्यांच्या बदल्यात अंबादास दानवेंना उतरवलं, ठाकरेंनी शिरसाटांना डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here