उदयपूर: राजस्थानच्या उदयपूरमध्ये हाथी पोल परिसरात असलेल्या मोचीवाडा गल्लीत मोहरम निमित्तानं मिरवणूक झाली. यादरम्यान ताजियाच्या वरच्या भागात आग लागली. गल्लीत राहणाऱ्या हिंदू कुटुंबानं तातडीनं ही आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे जिथे ही घटना घडली, तिथपासून जवळच टेलर कन्हैयालाल यांचं दुकान आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी कन्हैयालाल यांची दोन जणांनी चाकूनं अतिशय निर्घणपणे हत्या केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलटन मशिदीच्या शेवटच्या ताजियाची मिरवणूक हाथीपोल परिसरात असलेल्या अरुंद रस्त्यावरून जात होता. तेव्हा २५ फूट उंच असलेल्या एका ताजियाला आग लागली. शेजारच्या इमारतीत असलेल्या हिंदू कुटुंबानं आग पाहिली. त्यांनी पाणी टाकून ही आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील धोका टळला.
रक्षा बंधनादिवशी मोठी दुर्घटना; ५० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव बुडाली, आतापर्यंत ४ मृतदेह हाती
मोचीवाड्यातील एका रस्त्यावरून ताजियांचा प्रवास सुरू होता. त्यातील एका ताजियाला आग लागली. ही आग वेळीच विझवण्यात आली. आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पण हिंदू कुटुंबानं प्रसंगावधान राखल्यानं धोका टळला आणि अनेकांचा जीव वाचला. आग लागल्याचं दिसताच गल्लीच्या दोन्ही बाजूला राहत असलेल्या इमारतींमधील हिंदू कुटुंबीयांनी बादल्यांनी लगेच पाणी टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आग विझवली.

आशिष चौवाडिया, राजकुमार सोळंकी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वरून ताजियावर पाणी टाकलं. त्यामुळे आग विझली. हिंदू कुटुंबींनी सतर्कता दाखवल्यानं आग नियंत्रणात आली. याबद्दल मुस्लिम बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचे आभार मानले. त्यामुळे धार्मिक सलोख्याचं उदाहरण पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here