अंबादास दानवे प्रभारी जिल्हा प्रमुख झाल्यापासून खैरे आणि दानवे हा संघर्ष सुरू झाला. २०१३ मध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोरही दानवे-खैरे भिडले होते. वाद इतका टोकाला गेला होता की या झटापटीत दानवे यांच्या तोंडाला खैरे यांचा हात लागला आणि दानवेंच्या तोंडातून रक्त वाहू लागलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये मनपा निवडणुकीदरम्यान तिकीट वाटपावरून पुन्हा दोघांत वाद झाला. या वादात मातोश्रीवरून हस्तक्षेप करण्यात आला.
२०१९ लाही गट प्रमुखांच्या याद्यांवरून संस्थान गणपती येथे रस्त्यावरच दोन्ही नेत्यांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. चंद्रकांत खैरे लोकसभेत पराभूत झाल्यावर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी दानवेंनी प्रयत्न केले असं म्हटलं जातं. जिल्हाप्रमुख पदावरून दानवे यांना हटवण्यासाठी खैरेंनी मातोश्रीवर अनेकवेळा प्रयत्न केले. पण त्यात काही त्यांना यश आलं नाही. अंबादास दानवेंचं आक्रमक राजकारण, संघटनावरील पकड त्यांना कामी आली आणि मातोश्रीवरही त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली..
आता तनवाणींवरून पुन्हा हे दोन नेते भिडल्याचं पाहायला मिळालं. पण या वादानंतरही अंबादास दानवे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला हात न लावता त्यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडून देण्यात आलं. त्यामुळे खैरे जेष्ठ नेते असले तरी दानवे शिवसेनेसाठी खास असल्याचं दिसून आलं.
अंबादास दानवेंनी शिवसेनेत कसा जम बसवला?
भाजपमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या दानवेंनी १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २००० मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा महापालिकेत निवडून गेले आणि नगरसेवक झाले. त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली. सभागृह नेता असताना जमीन घोटाळ्यामुळे ते वादात सापडले. थेट बाळासाहेब ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर पुढील चार वर्षे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून संघटनेचं काम केलं. ऑक्टोबर २००४ मध्ये शिवसेनेने त्यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. आता त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं आहे.
दानवे हे शिवसेनेतील उत्कृष्ट संघटन करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेद असतानाही सेनेतील तरुणांना वेगवेगळया माध्यमांतून बांधून ठेवण्यात त्यांना यश आलंय. ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्ता बांधून ठेवणारा नेता अशी दानवे यांची ओळख आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी असूनही मातोश्रीवर त्यांचं वजन दिसून येतं.