रुग्णाचा सोलापूर-पुणे महार्गावर झाला होता अपघात
जून महिन्यात महेंद्र गायकवाड यांचे सोलापूर पुणे महार्गावर अपघात झाला होता. तेव्हा त्यांना सोलापुरातील आधार सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर होती. त्यावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. जून महिन्यापासून आजतागायत महेंद्र गायकवाड हे आधार हॉस्पिटलमध्येच होते.
५ जुलै रोजी मिळाला होता डिस्चार्ज
जवळपास ५ ते ६ लाख रुपये हॉस्पिटलचे बिल झाले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी औषध दुकानाची सर्व बिल असे एकूण ३.५० लाख रुपये भरले होते. ५ जुलै २०२२ रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी हॉस्पिटलचे बिल भरा असे म्हणून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पंरतु, रुग्णाची व त्याच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने बिल भरण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णास पैसे भरल्याशिवाय जाता येत नाही म्हणून रुग्ण व त्याच्या पत्नीस जाऊ दिले नाही. त्यांना १ महिना ६ दिवस रुग्णालयात डांबून ठेवले होते.
सोशल मीडियावर रुग्णाचा व्हिडीओ वायरल
महेंद्र गायकवाड याने एक व्हिडिओ तयार केला. हॉस्पिटलने मला वेठीस धरले आहे, हॉस्पिटलचे बिल भरून माझे घरदार विकले आहे. आता आणखीन बिल भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी आत्महत्या करणार, असा व्हिडीओ सोशल मीडियावर त्याने अपलोड केले होते. हा व्हिडीओ मुंबई ,पुणे ,औरंगाबाद आदी शहरात वायरल झाला होता आणि थेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला.
एकनाथ शिंदे समर्थकाने हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णाची सुटका केली
सोलापुरातील एकनाथ शिंदे समर्थक मनीष काळजे यांनी हा व्हिडीओ पहिला आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांसोबत चर्चा केली. आपल्या समर्थकांसह सोलापुरातील आधार हॉस्पिटल गाठले. रुग्णाची तब्येतीबाबत विचारपूस करत , डिस्चार्ज तारीख विचारून घेतली. रुग्णालयाने देखील अडमुठ्या भाषेत उत्तर देत, बिल भरा आणि घेऊन जा असे सांगितले. यावरून काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. महिनाभर रुग्णास डांबून ठेवले, वेठीस धरले , असे करणे बेकायदेशीर आहे असे त्यांनी सांगितले. तुम्ही प्रशासनाकडे दाद मागा असे सांगत त्यांनी शेवटी रुग्णाची सुटका केली.