मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यात त्यांनी पत्रकारांसोबत तापोळा येथे संवाद साधला. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच माझ्या भागात आलो. मात्र, माझं झालेलं स्वागत पाहून मला खूप आनंद वाटला. माझ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला मिळाला. आपला माणूस मुख्यमंत्री झालेला त्यांना पाहायला मिळाला. यामुळे त्यांनी मोठ्या जल्लोषात माझं स्वागत केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
माझी कर्मभूमी मुंबई असली तरी माझी ही जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेलं स्वागत हे आनंदायीच असतं. हे सरकार शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी हे सरकार पुढं नेत आहोत. मात्र लोकांच्या अपेक्षा या ठिकाणी वाढलेल्या पहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘आमचं सरकार डबल इंजीन सरकार’
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. पुनर्वसनाचे सगळे प्रश्न लवकरच सोडवले जातील. युद्धपातळीवर आम्ही ते सोडवू. तसंच आमचं डबल इंजीन सरकार आहे, यामुळे आम्ही डबल स्पीडने काम करू. पर्यटनाच्या दृष्टीने साताऱ्याचा पश्चिम भाग महत्वाचा आहे. तसेच या भागाच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा विचार सुरू असून लवकरच या बाबतीत निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
‘पर्यटनाला साताऱ्यात चांगला वाव’
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यटनाला साताऱ्या चांगला वाव आहे. या बाबतीत सुद्धा खूप काम करण्यासारखं आहे. या दृष्ठीने सरकार या सर्वाबाबतीत योग्य यो निर्णय घेऊन काम करेल.