अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि आता कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. शिवसेनेचे विविध पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असताना सत्तेत सहभागी असलेला भाजपही सक्रिय झाला आहे. विरोधी पक्षातील विविध नेते आता भाजपची वाट धरत असून अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

बळीराम सिरस्कार यांनी मुंबईत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी विदर्भातील भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे उपस्थित होते. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी बळीराम सिरस्कार हे अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.

या गावाच्या नशिबी मरणयातना; आधी पुलाअभावी शेतकऱ्याचा मृत्यू, आज महिलेची पाण्यातून अंत्ययात्रा

बळीराम सिरस्कार यांचा राजकीय प्रवास

बळीराम सिरस्कार हे भारिप बहुजन महासंघाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात सलग १० वर्ष आमदार राहिले आहेत. सिरस्कार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारिपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या तीन वर्षात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे ते अस्वस्थ होते. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे काहीतरी पदरात पडणार, या आशेवर असलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार यांची आशा सत्ता गेल्यामुळे मावळली. त्यामुळे त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बाळापूर मतदारसंघात माळी समाजाचे प्रमुख नेते म्हणून सिरस्कार यांची ओळख आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदारसंघात त्यांचा फायदा होईल, या दृष्टीने त्यांना सामावून घेण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतल्याचं दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here