प्राथमिक माहितीनुसार, जावेद आणि आसिफ गुरुवारी माहीमच्या दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही खाडीपाशी गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. पाऊस आणि समुद्राला भरती असल्याने मिठी नदीच्या पाण्याची पातळी जास्त होती. एकजण नदीत पडल्यावर दुसरा त्याला वाचवायला गेला. मात्र, तोदेखील पाण्यात पडला आणि दोघेही वाहून गेले. मध्यरात्री भरती असल्याने अग्निशमन दलाला बचावकार्य राबवता आले नाही. भरती ओसरल्यानंतर अग्निशम दलाने पहाटेपासून बचावकार्याला सुरुवात केली. यावेळी मिठी नदीच्या किनाऱ्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या तरुणाचा शोधण्यासाठी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.
मुंबईत पावसाचा जोर मंदावला
राज्यात पावसाचा जोर मंदावला आहे. मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभरात पावसाळी वातावरण असले, तरी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. ठाण्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा वेग अधिक होता. मुंबई, पालघर आणि ठाणे क्षेत्रामध्ये सोमवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी पडतील, अशी शक्यता आहे. मात्र रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत घाट परिसरात सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी रविवारी मेघगर्जनेसह पाऊस असेल. भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, येथे रविवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. राज्यात महाबळेश्वर वगळता इतर केंद्रांवर हलक्या सरींची किंवा रिमझिम पावसाची दिवसभरात नोंद झाली. महाबळेश्वर येथे दिवसभरात ८२ मिलिमीटर पाऊस पडला. येथे बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० या वेळेत २२५.४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. खेड येथे ११८, सावंतवाडी येथे १७०, चंदगड येथे १२२, इगतपुरी येथे ११७ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात बहुतांश केंद्रांवर पाऊस नव्हता. विदर्भातही अत्यल्प पाऊस नोंदवला गेला. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातही एखाद-दुसरे केंद्र वगळता इतर केंद्रांवर ५० मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडला.