आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला आमिर त्याच्या सिनेमांच्या कथानकांची निवड करत असतो. मग, ते कथानक ‘ओरिजनल’ असो किंवा ‘रिमेक’. बॉलिवूडने दिलेलं ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे बिरुद मिरवताना या वेळी आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा घेऊन आलाय. १९९४ झाली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या अमेरिकन सिनेमाचा अधिकृत भारतीय रिमेक आहे.

मुळात ‘फॉरेस्ट गंप’ हा चित्रपट १९९४ साली महत्त्वपूर्ण ठरला, कारण अमेरिकेतील तत्कालीन आणि ऐतिहासिक घडामोडींचं चित्रण केलं गेलं होतं. यातून प्रेक्षकांच्या भावभावनेचा, आणि विचारसरणीचा वेध या सिनेमाने घेतला होता. एक नवं तत्त्वज्ञान या सिनेमानं प्रेक्षकांना दिले. ‘नि:स्वार्थी भावनेनं केलेली कृती ही यशाकडे मार्गक्रमण करते’ हा त्यातील एक संदेश आजही २८ वर्षांनंतर ‘फॉरेस्ट गंप’ पाहिलेल्या प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. सिनेमाची मूळ कहाणी ही कालातीत आहे. म्हणूनच अतुल कुलकर्णी यांनी हा सिनेमा भारतीय अवकाशात लिहिण्याचे धाडस केले असावे, जो लिखाणाच्या (रुपांतर) पातळीवर ‘कल्पक’ झाला आहे. पण, दिग्दर्शनाच्या पातळीवर अपेक्षित किमया दाखवू शकलेला नाही.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टी ‘फॉरेस्ट गंप’नं दिली होती. याचीच पुनरावृत्ती भारतीय अवकाशात ‘लाल सिंह चड्ढा’ करू पाहतो. यात तो कथानकाच्या पातळीवर भावनिकदृष्ट्या ठाव घेतो. पण, सादरीकरणाच्या अनुषंगाने ‘अपूर्ण’ राहतो. नायक लाल सिंह चड्ढाच्या (आमिर खान) निरागस नजरेतून इतिहासाचे (तथाकथित) दर्शन हा सिनेमा आपल्याला घडवतो. सिनेमाची कथा पंजाबमधील लाल सिंह चड्ढा (आमिर खान) या मुलाची आहे, जो अपंग आहे आणि आधाराशिवाय चालू शकत नाही. त्याची आई (मोना सिंग) त्याला हे सांगून सतत प्रोत्साहन देते की तो इतरांपेक्षा कमी नाही. शाळेत लालला त्याची वर्गमैत्रिण रुपा (करीना कपूर) भेटते. सर्व लालला हिणवत असतात; परंतु, रुपा लालला समजून घेणारी असते. पुढे कथानकाचा प्रवास आणि त्याचा पसारा प्रचंड मोठा आहे. हे कथानक कल्पनेच्या पलीकडे वळणं घेत असतं. भारतातील ऐतिहासिक घटना लेखक अतुल कुलकर्णी यांनी खुबीनं कथानकात पेरल्या आहेत. लेखक म्हणून पदार्पण करण्यात कुलकर्णी यांनी तसा उशीरच केला असं म्हणावं लागेल. साधारण १९८३च्या विश्वचषक विजयापासून ते अमृतसरमधील सुवर्णमंदिराची घटना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, लालकृष्ण अडवाणी यांची अयोध्या यात्रा, बाबरी मशीदपतन, मुंबई शेअर बाजारातील बॉम्बस्फोट, कारगिलमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी, मुंबईवरील २६/११चा हल्ला, रामलीला मैदानावरील उपोषण.. ‘अबकी बार मोदी सरकार’पर्यंत अनेक महत्वपूर्ण घटनांचा वेध सिनेमात घेण्यात आला आहे. यातील काही निवडक घटनाच दिग्दर्शकाने प्रभावीपणे पडद्यावर सादर केल्या आहेत. उर्वरित घटनांचे ओझरते दर्शनच हा सिनेमा घडवतो.

एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना आणि कथानकात येणारी अनपेक्षित वळणं प्रेक्षकांसाठी, खास करून ज्यांनी मूळ ‘फॉरेस्ट गंप’ सिनेमा पाहिलेला नाही; त्यांच्यासाठी भुवया उंचावणाऱ्या आहेत. पण, ज्यांनी मूळ सिनेमा पाहिलेला आहे, त्यांच्यासाठी तो काहीसा कंटाळवाणादेखील ठरू शकतो. सिनेमा पूर्वार्धात जितका ‘भक्कम’ आहे तितकाच उत्तरार्धात ‘ढिसाळ’ झाला आहे. लाल सिंह चड्ढा ही व्यक्तिरेखा आमिर खानने प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील भावनिकता, भाबडेपणा आमिरनं त्यांच्या अभिनयातून पुरेपूर दाखवला आहे. परंतु, त्याच्या अभिनयातील काही लकबी ‘पीके’ चित्रपटाची आठवण करुन देतात. आमिरची तुलना ‘टॉम हँक्स’शी न झालेलीच बरी, कारण आमिरच्या लालमध्ये एक प्रकारची कृत्रिमता दिसून येते. जी, सिनेमाला तिची अपेक्षित उंची गाठण्यास अडथळा ठरते. दुसरीकडे रुपा (करीना कपूर खान) ही व्यक्तिरेखा लेखकाने भारतीय अवकाशातील मर्यादा विचारात घेऊन लिहिली गेली आहे. काही प्रसंगांमध्ये करीनाने उत्कृष्ट काम केलं आहे. सोबतच मोना सिंगनंदेखील आपली भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. लालच्या मित्राच्या भूमिकेत असलेला बाला अर्थात नागा चैतन्य प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहतो.

सिनेमांचे निर्मिती मूल्य आणि त्यासाठीचा लवाजमा सिनेमात प्रकर्षाने दिसतो. तांत्रिक पातळीवर सिनेमा आखीवरेखीव करण्यात आला आहे. पार्श्वसंगीत आणि गीतं सिनेमाला आधार देतात. पण, अद्वैत चंदन दिग्दर्शक म्हणून ‘लाल सिंह चड्ढा’ला पूर्ण न्याय देऊ शकलेला नाही. बाकी सिनेमा तुमचं रंजन करतो; हसवतोदेखील. दस्तुरखुद्द अठरा वर्षांचा शाहरुख खान जेव्हा कथानकात अनपेक्षित एंट्री घेतो; तेव्हा थिएटरमध्ये टाळ्या-शिट्ट्या घुमल्याशिवाय राहत नाही. प्रदीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर आलेला आमिरचा ‘एक्स फॅक्टर’ या वेळी तितकासा प्रभावी नसला, तरी भूतकाळातील घटना निरागस नजरेतून पाहायाला शिकवतो.

Laal Singh Chaddha

सिनेमा : लाल सिंह चड्ढा

निर्मिती : आमिर खान, किरण राव

दिग्दर्शक : अद्वैत चंदन

लेखन : अतुल कुलकर्णी

कलाकार : आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य

छायांकन : सत्यजित पांडे

दर्जा : तीन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here