यावेळी एकनाथ खडसे यांना पंकजा मुंडे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळाल्यामुळे सुरु झालेल्या चर्चेविषयी विचारण्यात आले. त्यावर एकनाथ खडसे यांनी म्हटले की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत, त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर तर सातत्याने अन्याय होत आहे. आतादेखील पुढील मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतील की नाही, याबाबत शंकाच वाटते. माझ्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा आहेत. परंतु, त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
मीदेखील गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत होतो. भाजपमध्ये जे जे लोक मुंडेंच्या जवळ होते, ते आता बाजूला पडले आहेत. मात्र, पुढील काळात त्यांना न्याय मिळेल, अशी आशाही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तसेच मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ४० दिवसांनी झाला. आता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी आणखी किती वेळ लागेल, हे माहिती नाही. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसत आहे, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.
कदाचित माझी पात्रता नसेल, म्हणून मंत्रीपद दिलं नसेल : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याबद्दल सूचकपणे प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तुमचं नाव नेहमी चर्चेत असतं, पण मंत्रिपद मिळत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी पंकजांना विचारला. त्यावर, चर्चेत असण्यासारखंच माझं नाव आहे. पण तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोकं असतील, जेव्हा त्यांना वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा देतील, मला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. त्यांना जेव्हा वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा देतील, त्यात माझा काही रोल नाही, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले.