Pankaja Munde Cabinet Expansion | चर्चेत असण्यासारखंच माझं नाव आहे. पण तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोकं असतील, जेव्हा त्यांना वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा देतील, मला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. त्यांना जेव्हा वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा देतील, त्यात माझा काही रोल नाही, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले.

या सगळ्या वादावर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, पंकजाताई नेमकं काय म्हणाल्या ते मी अजून ऐकलं नाही. ते मी नक्की ऐकेन. पण पंकजा मुंडे नाराज आहेत, असे मला वाटत नाही. पण पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील. पंकजा मुंडे यांना आणखी मोठं पद मिळेल. त्यामुळे पंकजाताई नाराज आहेत, असं म्हणण्याचे कारण नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना फटकारले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे हे एकटे म्हणजेच ओबीसी समाज नव्हेत. मंत्रिमंडळ विस्तारात गुलाबराव पाटील आणि मला स्थान मिळाले आहे, आम्हीदेखील ओबीसी समाजातूनच आलो आहोत. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी स्वत:ला ओबीसी समाज समजू नये, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याबद्दल सूचकपणे प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तुमचं नाव नेहमी चर्चेत असतं, पण मंत्रिपद मिळत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी पंकजांना विचारला. त्यावर, चर्चेत असण्यासारखंच माझं नाव आहे. पण तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोकं असतील, जेव्हा त्यांना वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा देतील, मला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. त्यांना जेव्हा वाटेल माझी पात्रता आहे, तेव्हा देतील, त्यात माझा काही रोल नाही, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले.