या छापेमारीत एवढ्या नोटा सापडल्या की नोटांची एख अख्खी भिंतच तयार झाली. विशेष बाब म्हणजे, पैसा मोजता मोजता चक्क आयकर विभागाचे अधिकारी आजारी पडले. त्यामुळे जालन्यातील या महा खजिन्याची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे. या आठ दिवसांच्या छापेमारीमध्ये पोलिसांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी यांच्याही प्रकरण यासमोर फेल आहे. काही दिवसांआधी पश्चिम बंगालमध्ये इनकम टॅक्स विभागाने छापे टाकले होते. याच्यामध्ये उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात आतापर्यंत २० कोटी इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टपासून स्टील टीएमटी बारच्या तयारीमध्ये गुंतलेल्या दोन मोठ्या गटांच्या ठिकाणी ही शोध मोहीम करण्यात आली. यादरम्यान जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईतील व्यापार्यांचे ३० हून अधिक परिसर तपासून काढले. त्याचबरोबर ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले त्यात एसआरजे स्टील (SRJ Steel ) आणि कालिका स्टीलचा (Kalika Steel )समावेश आहे. या कंपन्यांशी संबंधित सहकारी बँक (Co-operative Bank), फायनान्सर विमल राज बोरा (Financier Vimal Raj Bora )आणि डीलर प्रदीप बोरा (Dealer Pradeep Bora)यांच्या ठिकाणांवरही शोध मोहीम राबवण्यात आली.
यामध्ये, एसआरजे पीटी स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (SRJ Peety Steels Private Limited )गेल्या ३७ वर्षांपासून धातू आणि रसायनांच्या उत्पादनांचा व्यवसाय सुरू आहे तर कालिका स्टील ही कंपनी टीएमटी बार बनवते. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी २००३ मध्ये सुरू झाली होती.
फिल्मी स्टाईलमध्ये झालेल्या या छाप्यात व्यावसायिक गट मोठ्या प्रमाणात करचोरी करत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली आहे. टीमने एसआरजे स्टील आणि कालिका स्टील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने उघडलेले लॉकर्सही शोधून काढले. सहकारी बँकेत असलेल्या या लॉकर्समधून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. इतकंच नाहीतर, एका गटाच्या फार्म हाऊसवर असलेल्या गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. शोध मोहिमेत आतापर्यंत ५६ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि १४ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.