वाहन चालकांनी आपापली वाहने गॅरेज मध्ये दाखवल्यानंतर पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल सोबत पाणी असल्याचं उघड झालं. यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासणी केली असता पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं. तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल बाटलीत घेतले आणि पाहणी केली तर पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचे दिसून आलं.
यावेळी पेट्रोल भरलेल्या वाहनचालकाच्या तक्रारी आणि गर्दी पेट्रोल पंपावर वाढत गेली. यावेळी ग्राहकांच्या अनेक तक्रारी ऐकून घेतल्यानंतर शेवटी पेट्रोल विक्री थांबवण्यात आली. यानंतर पेट्रोलची तपासणी करण्यात आली परंतु त्यात पाणी आढळलेच नाही, तर मग इतक्या ग्राहकांच्या पेट्रोल टाकीमध्ये पाणी आले कुठून? हा प्रश्न यावेळी निर्माण झाला. मात्र, यावेळी पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. यानंतर पेट्रोल पंपाचे मॅनेजर पटेल यांनी संबंधित प्रकरणासंदर्भात आलेल्या ग्राहकांचे समाधान करण्यासाठी आणि आपल्या पेट्रोलमध्ये पाणी नाही हे सांगण्यासाठी प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.
वातावरणामुळे झाकणाला तयार झालेले दवाबिंदूमुळे पेट्रोल टाकीमध्ये पाणी
पेट्रोल पंपाच्या मॅनेजरने पेट्रोलच्या टाकीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आढळून आलं नाही. तर मग हे पाणी आलं कुठून असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आपल्या पेट्रोल टाकीच्या वातावरणामुळे झाकणाला तयार झालेले दवाबिंदूमुळे पेट्रोल टाकीमध्ये पाणी तयार झाले असेल असे उत्तर दिल्याने तरी देखील नागरिकांचे समाधान झाले नाही. मात्र, त्यानंतर पेट्रोल कंपनीशी बोलून ज्या ज्या ग्राहकांनी सकाळपासून पेट्रोल टाकले होते त्या त्या ग्राहकांना पुन्हा नव्याने पेट्रोल देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पेट्रोल चालकांनी केला.