पुणे : शहरात रस्त्याच्या वादामुळे मुलांना सुट्टी देण्याची वेळ एका शाळेवर ओढावल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘सिंहगड सिटी’ या शाळेकडे जाणारा एकच रस्ता आहे. मात्र हा रस्ता खासगी मालकीचा आहे. महापालिकेकडून कोणताही मोबदला न मिळाल्याने सदर जागेच्या मालकाने रस्ताच बंद करून टाकला. शाळेत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

महापालिकेला याबाबत वारंवार सूचना देऊनही पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप जागेच्या मालकाने केल आहे, तर या सगळ्या वादात विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याने पालकांनीही पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी शासकीय सुट्टी होती तर बुधवारी ऑनलाईन शाळा भरवण्यात आली. गुरुवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शाळेला सुट्टी होती, मात्र शुक्रवारी शाळा कशी भरावी? असा प्रश्न शाळा व्यवस्थापनला पडला आणि विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचाच निर्णय घेण्यात आला.

सोन्याच्या मण्यांचा पाऊस, महामार्ग थांबवून झाली तुफान गर्दी; एकाने अचानक फोडला मणी…

जागा मालकाचं नेमकं काय आहे म्हणणं?

रस्ता बंद करत असताना जागेच्या मालकाने आपली भूमिका मांडली आहे. ‘मागील १७ वर्षांपासून आमचे मैत्रीचे संबंध असल्याने आम्ही आमच्या जागेतून शाळेसाठी रस्ता वापरण्यासाठी दिला होता. सिंहगड शाळेसाठी २००७-२००८ मध्ये पालिकेकडून जो रास्ता मंजूर करण्यात आला होता, तो आता अस्तित्वात नाही. त्यामुळे आमच्या खासगी रस्त्याचा वापर सुरू होता. मात्र आम्हाला कोणताही मोबदला दिला जात नाही,’ असं या जागा मालकाचं म्हणणं आहे.

दरम्यान, महापालिकेने याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून हा वाद मिटवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here