मुंबई :मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दशकांपासून मुंबई पालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेसाठी यंदाची निवडणूक सर्वाधिक आव्हानात्मक ठरणार आहे. कारण आमदार आणि खासदारांच्या बंडखोरीने शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत असताना पक्ष न सोडता थेट शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, ही कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर लढली जात आहे. या पार्श्वभूमीवर होणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आज शिवसेना भवन येथे पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवनात माजी नगरसेवकांची बैठक होत असून या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यात येत आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ग्रामीण महाराष्ट्रासह मुंबईतीलही काही आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षसंघटना आपल्याकडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.

Devendra Fadnavis: मराठा नसून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी एवढं केलं, पण तुम्ही काय केलंत; उदयनराजेंचा सवाल

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नक्की कोणाला मिळणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे चिन्ह मिळो वा न मिळो, संघटनेच्या जोरावर पुन्हा एकदा मुंबईत आपली ताकद दाखवून द्यायची, असा उद्धव ठाकरे यांचा इरादा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शहरातील शिवसेनेच्या विविध शाखांना भेट देत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत. आदित्य यांच्याकडून हा संवाद सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.

BJP: मुंबई भाजपचं अध्यक्षपद आशिष शेलारांना, पण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या निवडीत भाजपचं धक्कातंत्र?

गेल्या काही दिवसांपासून मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानासह पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय असणाऱ्या शिवसेना भवनात विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहे. त्याअंतर्गतच आज शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचा नेमका तपशील अद्याप हाती आला नसला तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या जुन्या-जाणत्या नेत्यांना या माध्यमातून विश्वासात घेऊन ताकद देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने या निवडणुकीबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here