Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 12, 2022, 2:58 PM
Aurangabad news : औरंगाबादेत भावाला राखी बांधून भावासोबत दुचाकीवर सासरी परतणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिल्लीगेट रोडवरील सलीम आली सरोवर परिसरात एन राखी पौर्णिमेच्या दिवशी काल गुरुवारी घडली.

हायलाइट्स:
- भावाला राखी बांधून सासरी निघालेल्या बहिणीचा अपघातात मृत्यू
- औरंगाबादेतील दिल्लीगेट रोडवरील धक्कादायक घटना
- कारने जोरदार धडक दिल्याने अपघात, भाऊ गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुषा या हडको कॉर्नर परिसरात राहणारे त्यांचे भाऊ गजानन अनवेकर यांना राखी बांधण्यासाठी बुधवारी रात्री औरंगाबाद आपल्या माहेरी आल्या होत्या. मंजुषा या अशावर्कर असल्याने त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशीच लसीकरणाला जायचे होते. त्यांनी काल गुरुवारी सकाळीच भावाला राखी बांधली आणि त्यानंतर गजानन हे त्यांच्या दुचाकीवर बहिणीला घेऊन बसस्थानकाकडे सोडण्यासाठी निघाले. वाटेत सलीम आली सरोवर परिसरात (एम.एच.२० सी.एस ०५५५) या कारने अनवेकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात मंजुषा व गजानन गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपस्थित नागरिकांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत मंजुषा यांचा मृत्यू झाला होता. मंजुषा यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर गजानन यांच्यावर उपचार सुरू आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीवरून कारचालक ज्ञानेश्वर कारभारी जाधव (रा. घोडेगाव ता. खुलताबाद) याच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network