घोषित कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होणार असून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ पर्यंत असणार आहे. मतदान १८ सप्टेंबरला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाचपर्यंत करता येणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
कोल्हे-आढळरावांची प्रतिष्ठा पणाला
पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे मैदान असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील ६२ ग्रामपंचायतीत निवडणूक होत असल्याने पुणे जिल्ह्याचे राजकारण कमालीचे तापणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक होत असली तरी ही लढाई प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट अशीच होणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेले शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
आढळराव पाटील यांचे गाव असलेल्या आंबेगावात १८ तर राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांचे प्राबल्य असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत कोल्हेंना मोठे मताधिक्य देणाऱ्या जुन्नर तालुक्यात ३८ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असल्याने दोन्ही नेत्यांनी आतापासूनच जय्यत तयारी सुरु केली असून दोन्ही नेते आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. राष्ट्रवादी आपल्याला कमजोर करत असल्याची टीका करत शिंदे गटात दाखल झालेल्या आढळराव पाटलांसाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.