सोलापूर :एकनाथ शिंदे गट मुंबईतील दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याचं वृत्त आहे. शिवसेना आमदार खासदारांना तसेच मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या लोकांसाठी प्रशस्त कार्यालय हवं, असा एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. त्यादृष्टीने जागेची चाचपणी सुरु असल्याचंही कळतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, मंदिर बांधलं तरी त्यामध्ये देव पाहिजे ना…!, अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिवसेनेतले दोन तृतियांश आमदार खासदार फोडून ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पुढील लक्ष्य ठरवलं आहे. ज्या शिवसेना भवनातून जवळपास गेली ५ दशकं पक्षाचा कारभार चालला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले गेले, अनेकांना जिथल्या तिथे न्याय दिला गेला, अनेकांच्या राजकीय आयुष्याला याच शिवसेना भवनातून कलाटणी मिळाली, त्याच शिवसेना भवनावर एकनाथ शिंदे दावा सांगणार, अशी चर्चा गेली काही दिवस सुरु होती. पण आता मुंबईच्या मध्यवर्ती भागातील दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. लवकरच यासंदर्भातील पुढील पावलं उचलली जातील, अशी माहिती आहे.

ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार
याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “मंदिर बांधायला निघाले आहेत. त्यामध्ये देव असणार का? कारण देव तर अगोदरच्या शिवसेना भवनात आहे…” सोलापुरातील एमआयएमच्या सात नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी जयंत पाटील सोलापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप-शिंदे गटाला धक्का

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला संपवून २०२४ मध्ये शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकहाती जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. मात्र, जनतेची सध्याची भावना पाहता आता लगेच लोकसभा निवडणूक झाली तर भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीने एकत्र राहून निवडणूक लढवल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे

इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाने घडवून आणलेले सत्तांतर राज्यातील जनतेला फारसे आवडलेले नाही, याविषयी त्यांच्या मनात रोष आहे, असे अनुमान काढायला वाव आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या या सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळतील. तर भाजपप्रणित एनडीएची १८ जागांपर्यंत घसरण होईल. हा भाजपसाठी खूप मोठा धक्का असेल. भाजप आणि शिवसेनेने २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४२ जागांवर विजय मिळवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here