मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळात विस्तारात आरोपांच्या घेऱ्यात असलेल्या संजय राठोड यांना स्थान मिळाल्याने अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखठोक सवाल विचारले. तर दुसरीकडे राठोडांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने राठोड यांचा समाज, पोहरादेवीचे महंत यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे संजय राठोडांविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रान उठवलं, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी रौद्ररुप धारण केलं, त्याच चित्राताईंनी राठोडांना मंत्रिपद मिळाल्यानंतरही आपला संघर्षाचा नारा कायम ठेवत त्यांच्या मंत्रिपदाला कडाडून विरोध केला. राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध करणाऱ्या आणि संबंधित प्रकरणावरुन सतत टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना पोहरादेवीच्या महंतांनी इशारा दिला आहे. संजय राठोडांना राखी बांधा अन्यथा महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या संगतीला भारतीय जनता पक्ष जरी सत्तेत असला तरी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र राठोडांच्या मंत्रिपदाला जोरदार विरोध कायम ठेवलाय. एकतर राठोडांना मंत्रिपद मिळणं दुर्दैवी आहे, मात्र आता त्यांच्याविरोधातील माझा संघर्ष सुरुच राहणार असल्याचं सांगत इथून जोपर्यंत पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही तोपर्यंत राठोड विरुद्ध वाघ हा लढा पाहायला मिळणार अससल्याचं एकप्रकारे चित्रा वाघ यांनी सांगितलं. यानंतर पोहरादेवीच्या महंतांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

संजय राठोड तिकडे शपथ घेत होते, इकडे चित्रा वाघ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती…!
चित्रा वाघ यांनी प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करू नये. त्या बुद्धीवान असतील तर त्यांनी राठोडांच्या हातावर राखी बांधावी. जेव्हा संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतरही आरोप होत असेल तर, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराच महंतांनी दिला.

संजय राठोडांचा राजीनामा मिळविण्यात चित्रा वाघ यांचा सर्वाधिक वाटा…!

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांचा राजीनामा मागण्यासाठी चित्रा वाघ ताकदीने मैदानात उतरल्या. त्यांचा राजीनामा घेतला जावा, यासाठी सरकारवर टीका करत राहिल्या, सरकारवर सतत दबाव टाकत राहिल्या. पुणे पोलिस राठोडांची चौकशी करत होते, त्या पोलिसांची भेट घेऊन, त्यांच्या चौकशी प्रक्रियेवर चित्रा वाघ यांनी ताशेरे ओढले. राठोडांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार हल्लाबोल केला. आज शिवाजीराजे असायला हवे होते. त्यांनी अशी लोकं कड्यावरुन ढकलून दिली असती, उद्धवजी आपण काय करणार आहात? म्हणत ठाकरेंकडे राठोडांच्या राजीनाम्याची दोन आठवडे मागणी केली. भाजप नेते राठोडांवर मौन बाळगून असताना चित्रा वाघ मात्र राठोडांवर तुटून पडत होत्या. अखेर उद्धव ठाकरेंना राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला, ज्यामध्ये चित्रा वाघ यांचा सर्वांत मोठा वाटा राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here