मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बऱ्याच प्रतीक्षेनंतर पार पडला असला तरी अद्याप खातेवाटप प्रलंबित आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये काही खात्यांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटप लांबत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून बच्चू कडू यांच्या वक्तव्याचा दाखला देत एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आजघडीला अनेक ‘सुप्त ज्वालामुखी’ आहेत. हे ज्वालामुखी कधी फुटतील, हे सांगता येत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊन अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकार अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

कुठल्या ना कुठल्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे, लाव्हारसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला. शिवाय ज्या मुद्द्यासाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे गुद्दे बच्चू कडू यांनी सरकारला लगावले. जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसविले आणि जो पहिला गेला त्याचा शेवटच्या रांगेत बसवले आहे, असे कडू यांनी म्हटले. जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रिपद मिळणार, अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवले. हाच धागा पकडत शिवसेनेकडून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

ट्विटरच्या डीपीवर उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणाले, शिरसाटांच्या मनात नेमकं काय?
संजय शिरसटांनी ते ट्विट केलं आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचं भाकीत

शिंदे-फडणवीस सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे संजय शिरसाट प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी, ‘मी दिलेला शब्द पाळेन’, असे सांगत संजय शिरसाट यांची समजूत काढली होती. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांसमोर सर्वकाही आलबेल असल्याचे म्हटले होते. परंतु, संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली.

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असं म्हटले. त्यामुळे संजय शिरसाट हे घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली होती. संजय शिरसाट यांनी हे ट्विट डिलीट केले होते. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी ‘सामना’तून शिंदे-फडणवीस सरकारमधील ‘सुप्त ज्वालामुखींचा’ उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here