परळ, हिंदमाता दरम्यान बांधल्या जाणाऱ्या पादचारी पुलाला स्वयंचलित सरकते जिने बसविण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील नवीन पादचारी पूल, स्कायवॉकलाही स्वयंचलित सरकते जिने अनिवार्य केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील दुर्घटनाग्रस्त हिमालय पूल नव्याने बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. या पुलासह चर्नी रोड येथील पादचारी पुलालाही स्वयंचलित सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. हिमालय पुलाच्या इथे उपलब्ध जागा कमी असल्याने तिथे सरकता जिना कसा बसवता येईल, याविषयी चाचपणी केली जात असल्याचे पालिकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत स्कायवॉक उपयुक्त ठरतील हा अंदाज प्रत्यक्षात फोल ठरला. वांद्रे पूर्वेकडील स्कायवॉकसारखे काही अपवाद वगळता बहुतेक सर्व स्कायवॉक खर्चाच्या दृष्टीने पांढरा हत्ती ठरले. ही वस्तुस्थिती लक्षात घेत नव्याने बांधल्या जाणाऱ्या स्कायवॉकना स्वयंचलित सरकत्या जिन्यांची सुविधा पुरविल्यास त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकेल, असा विश्वास पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, जुने पादचारी पूल आणि स्कायवॉकसाठीही पादचाऱ्यांनी स्वयंचलित सरकत्या जिन्यांची मागणी केल्यास पालिकेकडून त्याचा विचार केला जाऊ शकतो.
ज्येष्ठांसह दिव्यांग, विद्यार्थ्यांनाही उपयुक्त
सध्या पालिकेच्या पूल विभागाने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथील पादचारी पुलावर स्वयंचलित सरकत्या जिन्याची व्यवस्था केली आहे. त्यापूर्वी रेल्वेने बहुतांश रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित सरकते जिने, लिफ्टची व्यवस्था केली आहे. त्याचा फायदा रेल्वे प्रवाशांना होत आहे. सरकत्या जिन्यांमुळे एकाचवेळी होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन सुलभ झाले आहे. सरकत्या जिन्यांची सुविधा अन्य प्रवाशांप्रमाणेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुलांसाठी अधिक उपयुक्त ठरली आहे.