समीर ठाकरे हा शिक्षक वाडा येथे चाणक्य कोचिंग क्लासेसच्या नावाने खाजगी क्लासेस घेत होता. याच खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीने प्रवेश घेतला. मात्र पीडित मुलीचे वडीलही शिक्षक असल्याने त्यांनी काही दिवसातच या मुलीला खाजगी कोचिंग क्लास सोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितल्यानंतर या मुलीनेही खाजगी कोचिंग क्लास मध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र याचाच राग मनात धरून वाडा येथे चाणक्य कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या आरोपी शिक्षकाने या मुलीच अपहरण केले.
स्विफ्ट कारमधून या मुलीला वाडा तालुक्यातील एनशेत तेथील एका फार्म हाऊसच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पालघर पोलिसांनी आपली चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या बारा तासात या चिमुकल्या मुलीची सुखरूप सुटका करून आरोपींच्याही मुस्क्या आवळल्या. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपी अजूनही फरार आहेत. पालघर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पीडित मुलगी आपल्या घरी परतत असताना तिच्या बिल्डिंगच्या आवारातून तिचे अपहरण करण्यात आले. आपल्या खाजगी कोचिंग क्लासमधून पीडित मुलीला काढल्याचा राग खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्या शिक्षकाच्या मनात असल्याचा दावा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मात्,र दुसऱ्या बाजूला आपल्या मुलीची अवघ्या बारा तासात सुखरूप सुटका केल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभारही मानण्यात आले.
अवघ्या बारा तासात पीडित मुलीची सुटका करून आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पालघर पोलिसांना यश आले असले तरी एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाच्या मुलीचे केलेले अपहरण ही बाब धक्कादायकच आहे. त्यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना असून खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांविरोधात सध्या संताप व्यक्त करण्यात येतोय.