व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेल्या मार्मिकचा आज ६२ वा वर्धापनदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांची धगधगती आणि स्फोटक भाषणं देशभरात चर्चेचा विषय असायचीच पण त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सामाजिक राजकीय विषयांवर केलेलं ‘मार्मिक’ भाष्य आणि त्यांच्या कुंचल्यांच्या फटकाऱ्यांनी भलभले दिग्गज घायाळ व्हायचे. आज त्याच मार्मिकची बासष्टी संपन्न होत आहे. याच निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना व्हर्च्युअल माध्यमाद्वारे संबोधित केलं.
“भाजपने ज्यांना अध्यक्ष केलं त्यांच्या नावात किती कुळे आहेत, मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळे उतरली तरी शिवसेना नष्ट होणार नाही. मग ती बावन्न असतील किंवा एकशे बावन असतील. शिवसेना उघड्यावर पडली असं काहीजणांना वाटतं, पण शिवसेनेची पाळंमुळं घट्ट आहेत. प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे, ही लोकशाहीला घातक पाऊल आहे. नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का? गादीवर बसलात म्हणजे हम करे सो कायदा हे चालणार नाही. सध्या लोकशाही जिवंत कशी राहणार, याचा विचार करण्याची गरज आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं, त्याला वाचा फोडली
शिवसेनेची पाळंमुळं ६२ वर्षांपासूनची आहेत. त्याआधीपासून माझ्या आजोबांनीही या विचारांची पेरणी केली आहे. शिवसेनेची बीज मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने बीज पेरली. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं, त्याला वाचा फोडली. त्यातून मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला. शिवसेनेसाठी सामनाला जन्म दिला. शिवसेना नसती तर महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि देशात हिंदूंचं काय झालं असतं, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. व्यंगचित्रकार काय असतो, व्यंगचित्रकार काय करू शकतो याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणांचा ओढा, आकर्षण नेहमीच राहिले आहे. वयाने माणूस थकतो, शरीराने थकतो, पण विचारांनी थकता कामा नये. ज्या दिवशी विचार थकतील, त्या दिवशी माणूस वयस्कर झाला. मार्मिक ६२ व्या वर्षीही चिरतरुण आहे.