रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत. कवठेमहाकाळ नगरपालिकेत त्यांनी अनेक दिग्गजांना पाणी पाजत त्यांच्या गटाची एकहाती सत्ता आणली. तेव्हापासून ते पश्चिम महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आले आहेत. मध्यंतरी तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्याबाबतही हालचाली झाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.
आर. आर. हे आपले सहकारी होते. त्यांचे व माझे निकटचे संबंध होते. त्यामुळे मतदार संघात काहीही कामे असतील तर थेट मला फोन कर. ती कामे तातडीने केली जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. याशिवाय बाबर यांना भेटण्यास जाताना त्यांनी आर. आर. यांच्या पुतळ्याला अभिवादनही केले. या दोन्ही घटनांनी पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नरके शिंदे गटात जाणार?
शिवसेनेतच राहायचे की शिंदे गटात जायचे या संभ्रमावस्थेत असलेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही त्यामध्ये समावेश आहे. पण माजी आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेच्या कोणत्याही आंदोलनात अथवा कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. शिंदे गटातही जात असल्याची घोषणा करत नाहीत. यामुळे तळ्यात मळ्यात असलेल्या नरके यांनी आज शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला नव्याने उधाण आले.