शेलटी गावात बिबट्याने प्रचंड दहशत माजवली होती. गावात शिरलेल्या या बिबट्याने सर्वप्रथम एका शेतकरी महिलेवर झडप घातली. महिलेच्या चेहऱ्यावरच बिबट्याने पंजा मारला. महिलेच्या चेहऱ्याला त्यामुळे खोलवर जखमा झाला. गावातील गावडे कुटुंबातील ही महिला आहे. ही महिला कशीबशी बिबट्याच्या तावडीतून निसटली. त्यानंतर हा चक्क झाडावर चढून फांदीवर दबा धरून बसला. याबाबत माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम हे घटनास्थळी दाखल झाले. सर्वप्रथम महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. त्यासोबतच वन विभागालाही कळवण्यात आले.
अधिकारी काही वेळातच गावात आले. वन विभागाच्या रेंजर प्रियांका लगड व वनविभागाचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, बिबट्याला झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याने वनाधिकारी प्रियांका लगड यांच्यावर झडप घातली. प्रियांका यांचा पायच बिबट्याने पंजात पकडला. त्याचक्षणी मोठं धाडस दाखवत वनकर्मचारी पाटील व ग्रामस्थांनी मानवी साखळी करत बिबट्याला घेरले. प्रियांका यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवताना हाताची घट्ट पकड टाकत या सर्वांनी बिबट्याला पकडले. विठूमामा नितोरे, किसन नितोरे, संतोश नितोरे, अमित गावडे, सागर कदम, मयुर कदम या गावकऱ्यांनी या मोहिमेत वनकर्मचाऱ्यांना मदत केली. बिबट्या तावडीत येताच त्याला लगेच पिंजऱ्यात टाकण्यात आले. हा बिबट्या आता वनविभागाच्या ताब्यात असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामस्थ आणि वन विभागाच्या धाडसामुळे शेलटी गावातील बिबट्याची दहशत संपली आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines