मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि विधानपारिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं आहे. मेटे यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शोक व्यक्त करत मी माझा निकटचा सहकारी गमावला, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होतं. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे,’ असं ट्वीट करत अजित पवार यांनी विनायक मेटेंच्या निधनानंतर संवेदना व्यक्त केल्या आहेत.

विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी करणार, मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता गमावला : एकनाथ शिंदे

अपघात नेमका कसा झाला?

विनायक मेटे यांच्या गाडीला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील खालापूर टोलनाका येथे अपघात झाला. भरधाव ट्रकने मेटे यांच्या कारला दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांनी याबाबत बोलताना एक शंका उपस्थित केली आहे. ‘बीडहून मुंबईकडे निघालेल्या विनायक मेटेंचा रात्रभर प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे होते. माझ्या अंदाजानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात झाला असावा,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here