मेटेंच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. “शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
शिवछत्रपतींचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले
शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले व अनेकांना आपली आग्रही भूमिका पटवून देण्याची खबरदारी घेतली. आजच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या एका मोठ्या सामाजिक नेतृत्वाला आज आपण मुकलो. राजकारणापेक्षा सामाजिक विषयात रमणारा माणूस आज हरपला, लोकांसाठी लढणारा नेता हरपला, मराठा समाजासाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
एकेकाळी ते आमचे सहकारी होते
एकेकाळी ते आमचे सहकारी होते. महाराष्ट्र विधिमंडळातही त्यांनी काम केले. नंतर स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका त्यांनी घेतली. एका जिवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!
सकाळी उठल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकली
विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी आहे. सकाळी उठल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. गेली अनेक वर्ष विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. ते मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज उठवायचे. मेटे यांनी मराठा सामाजासाठी उल्लेखनीय काम केले. ते सामाजिक प्रश्नांची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजासाठी आयुष्यभर काम केलं, विनायक मेटेंच्या निधानानं पोकळी निर्माण झाली – सदाभाऊ खोत