नवी दिल्ली : भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झालं आहे. झुनझुनवाला यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच अकासा एअरलाईनच्या माध्यमातून त्यांनी हवाई वाहतूक क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. जीवनात येणाऱ्या अनेक आव्हानांना आपल्या बुद्धमत्तेच्या जोरावर चितपट करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना गंभीर आजाराने ग्रासलं होतं.

राकेश झुनझुनवाला यांना आज सकाळी अत्यवस्थ स्थितीत मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ६ वाजून ४५ मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. खरंतर किडनीसह विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या झुनझुनवाला यांना दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मागील काही महिन्यांत प्रकृती खालावल्याने त्यांचं वजनही कमालीचं घटलं होतं.

शेअर बाजारातील बिग बुल, भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळख, झुनझुनवालांची डोळे दिपवणारी संपत्ती

काही आठवड्यांपूर्वी झुनझुनवाला यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतील झुनझुनवाला यांची बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून गेली. घटलेलं वजन आणि खोल गेलेला आवाज यातून त्यांची प्रकृती आता कमालीची ढासळली असल्याचं समोर आलं होतं. या मुलाखतीनंतर सोशल मीडियावरून झुनझुनवाला यांच्या चाहत्यांकडून काळजीही व्यक्त करण्यात येत होती.

या मुलाखतीतच राकेश झुनझुनवाला यांनी कोव्हिड काळात झालेल्या शारीरिक त्रासावर भाष्य केलं होतं. ‘कोव्हिड काळात अनेक दिवस अंथरुणाला खिळून असल्याने माझ्या वजनात मोठी घट झाली होती. या सगळ्या काळात मला प्रचंड शारीरिक त्रासही झाला,’ असं ते म्हणाले होते.

दरम्यान, शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठी आर्थिक झेप घेतलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here