काय आहे चालकाचा दावा?
बीडहून मुंबईकडे निघालेल्या विनायक मेटे यांच्यासोबत गाडीत चालक आणि सुरक्षारक्षकही होते. खालापूर टोलनाक्याच्या जवळ असलेल्या बोगद्यात जाताना एका ट्रकने मेटे यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मेटे यांच्या कारच्या एका बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघाताबाबत माहिती देताना कारचालकाने म्हटलं आहे की, ‘पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान आमच्या कारला अपघात झाला. विनायक मेटे ज्या बाजूला बसले होते, त्या डाव्या बाजूला मोठ्या गाडीची जोरदार धडक बसली. आमची कार त्या मोठ्या गाडीने काही अंतर ओढत नेली. त्यामुळे विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आम्ही मदतीच्या प्रतिक्षेत होतो, पण आम्हाला तासभर वैद्यकीय मदत मिळाली नाही,’ असा गंभीर आरोप मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे.
पोलिसांचं काय आहे म्हणणं?
अपघातानंतर विनायक मेटे यांना उशिरा मदत मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘चालक एकनाथ कदम हे विनायक मेटे यांना घेऊन दुसऱ्या लेनने मुंबई बाजूकडे जात असताना कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला कारचा धक्का बसून हा अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्सने एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तिथे डॉ. धर्मांग यांनी तपासून मेटे यांना मृत घोषित केले. तसंच मेटे यांचे सुरक्षारक्षक पोलीस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकले होते. त्यांना कारमधून बाहेर काढून आयआरबी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल, कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आणि कार आयआरबी क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेतली या अपघाताबाबत आम्हाला ५ वाजून ५८ मिनिटांनी माहिती मिळताच आम्ही ताबोडतोब निघालो आणि ६ वाजून ५ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचलो होतो,’ असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, विनायक मेटे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.